गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी ॲड. विश्वजीत कोवासे यांची निवड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने राज्यातील विविध जिल्हा काँग्रेस कमिटींच्या अध्यक्षपदांच्या नियुक्त्या जाहीर केल्या असून, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी ॲड. विश्वजीत कोवासे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ॲड. विश्वजीत कोवासे हे मागील अनेक वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. संघटनात्मक बांधणी, पक्षकार्य आणि जनसंपर्काच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ते माजी खासदार मारोतराव कोवासे यांचे सुपुत्र असून, त्यांना राजकीय वारसा आणि दीर्घ अनुभवाची पार्श्वभूमी लाभलेली आहे.
गडचिरोलीसारख्या आदिवासी व दुर्गम जिल्ह्यात काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्याची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तसेच पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी ते प्रभावीपणे काम करतील, असा विश्वास काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांच्या नियुक्तीनंतर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या नेतृत्वक्षमतेवर विश्वास दाखवत ही महत्त्वाची जबाबदारी दिल्याचे बोलले जात आहे.
ॲड. विश्वजीत कोवासे यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




