महत्वाच्या बातम्या

 घोट अप्पर तालुका निर्मितीच्या प्रस्तावाला गती : चामोर्शी तहसील कार्यालयात आढावा बैठक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : घोट अप्पर तालुका निर्मितीच्या मागणीला गती देण्यासाठी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या पुढाकारातून चामोर्शी तहसील कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. काही दिवसांपूर्वी राज्याचे महसूल मंत्री मा. चंद्रशेखरजी बावनकुळे यांची भेट घेऊन घोट अप्पर तालुका निर्मितीच्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी संबंधित प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या होत्या.

त्या अनुषंगाने आज उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्यासोबत सविस्तर बैठक घेऊन प्रस्तावाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. तसेच घोट अप्पर तालुका निर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे लवकरात लवकर पाठविण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध प्रशासकीय बाबींवर चर्चा करण्यात आली.

यावेळी उपविभागीय अधिकारी संपतजी खलाटे, तहसीलदार प्रशांतजी घोरुडे, माजी पंचायत समिती सदस्य दीपकजी हलदार, भाजप घोट तालुकाध्यक्ष राकेशजी सरकार, ज्येष्ठ कार्यकर्ते विकासजी वैध, आदिवासी मोर्चा तालुकाध्यक्ष विलासजी उईके, अशोकजी पोरेड्डीवार तसेच घोट परिसरातील पदाधिकारी उपस्थित होते.

घोट परिसरातील नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीची पूर्तता व्हावी आणि प्रशासकीय सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध व्हाव्यात, यासाठी घोट अप्पर तालुका निर्मितीचा प्रस्ताव लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी दिली.

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनीही घोट अप्पर तालुका निर्मितीबाबत सकारात्मक भूमिका घेत शासनाने लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos