अल्पभूधारक शेतकऱ्याचे जनरल स्टोअर्स आगीत भस्मसात : अडीच लाखांचे नुकसान

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : शेतीला जोडधंदा म्हणून सुरू केलेले जनरल स्टोअर्स आणि त्यातून उभे केलेल्या संसाराचे स्वप्न अवघ्या काही तासांत आगीत भस्मसात झाल्याची दुर्दैवी घटना लाखांदूर तालुक्यातील राजनी येथे घडली. जिल्हा परिषद शाळेसमोरील लक्ष्मी जनरल स्टोअर्सला लागलेल्या भीषण आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले असून सुमारे २ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेमुळे ठाकरे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रमुख आधारच हिरावला गेला आहे.
राजनी येथील टिकाराम हरिदास ठाकरे ३९वर्ष हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. अल्पभूधारक असल्याने शेतीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण होत होते. त्यामुळे त्यांनी वर्षभरापूर्वी गावातील जिल्हा परिषद शाळेसमोर लक्ष्मी जनरल स्टोअर्स सुरू केले होते. या दुकानातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच त्यांच्या कुटुंबाचा प्रपंच सुरू होता.
१० जुलैच्या मध्यरात्रीच्या सुमारास दुकानाला अचानक भीषण आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने दुकानातील साड्या, रेनकोट, शालेय साहित्य, लॅमिनेशन मशीन, प्रिंटर, फर्निचर तसेच अन्य साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी टिकाराम ठाकरे यांना याबाबत कळविले. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने तोपर्यंत दुकानातील सुमारे अडीच लाख रुपयांचे साहित्य जळून राख झाले होते.
टिकाराम ठाकरे यांचे वडील त्यांच्या लहानपणीच वारले होते. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शेतीसोबत व्यवसाय सुरू करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे त्यांचा व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून कुटुंबासमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. शासनाने तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुकानावरून गेलेल्या पथदिव्यांच्या विद्युत तारांमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली असावी, असा प्राथमिक संशय दुकानदाराने व्यक्त केला आहे.
तसेच अज्ञात व्यक्तीने आग लावली असण्याची शक्यताही त्यांनी नाकारलेली नाही. या प्रकरणाचा तपास प्रभारी ठाणेदार आशिष गंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रमोद टेकाम व अंमलदार आकाश सोनुने करीत असून आगीमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, संकटग्रस्त ठाकरे कुटुंबाला शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
News - Bhandara




Petrol Price




