मे महिन्यात चंद्रपूर पोलिसांची धडक मोहीम : अवैध धंद्यांविरोधात कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी मे २०२६ महिन्यात विशेष मोहीम राबवत विविध बेकायदेशीर कारवायांविरोधात मोठी धडक कारवाई केली. दारूबंदी, जुगार, अवैध रेती उत्खनन, अमली पदार्थांची तस्करी, जनावरांची अवैध वाहतूक तसेच बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात करण्यात आलेल्या कारवायांमध्ये कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून शेकडो गुन्हे उघडकीस आले आहेत.
जिल्हा पोलीस दलाने दिलेल्या माहितीनुसार, दारूबंदी कायद्यांतर्गत महिनाभरात ५८४ गुन्हे उघडकीस आणण्यात आले. या कारवाईदरम्यान ४५ लाख ९० हजार ५९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हातभट्टी दारू तयार करणे व विक्री करणाऱ्यांविरोधातही पोलिसांनी मोहीम राबवून ४६ कारवाया केल्या असून ६ लाख ५१ हजार ३६५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
जुगार अड्ड्यांवर टाकलेल्या धाडीत ९० गुन्हे दाखल करण्यात आले असून ९ लाख ७ हजार ३ रुपयांची रोकड व साहित्य जप्त करण्यात आले. पर्यावरणाची हानी करणाऱ्या अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरोधात २७ कारवाया करत तब्बल ३ कोटी ३४ लाख ८५ हजार ५०० रुपयांची रेती आणि वाहने जप्त करण्यात आली.
गोवंशीय जनावरांच्या अवैध वाहतुकीविरोधात आणि प्राण्यांच्या छळाविरोधात करण्यात आलेल्या कारवाईत ९ गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणांत १ कोटी २७ लाख १५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी १३७ जनावरांची सुटका केली असून १३ वाहने ताब्यात घेतली. याशिवाय ७० किलो मांसही जप्त करण्यात आले.
अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात जिल्हा पोलिसांनी कठोर भूमिका घेत २१ गुन्हे नोंदवले. या कारवाईत १८ लाख ७८ हजार ५६८ रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. त्यामध्ये ६.२४१ किलो गांजा, १३०.९९ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) आणि २.२६७ किलो डोडा पावडरचा समावेश आहे.
चोरीच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या कारवाईत मोटारसायकल चोरीचे १० गुन्हे उघड करण्यात आले असून ४ लाख ३ हजार रुपयांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. प्रतिबंधित सुगंधित तंबाखू विक्रीविरोधात १२ कारवाया करून १७ लाख ३४ हजार ६२ रुपयांचा माल जप्त करण्यात आला. सीओपीटीए कायद्यांतर्गत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान व तंबाखू सेवनाविरोधात १४४ गुन्हे नोंदवून २८ हजार ८०० रुपयांचा दंड व मुद्देमाल वसूल करण्यात आला.
बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधातही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. हत्यार कायद्यांतर्गत ९ कारवाया करून दोन भरमार बंदुका, एक पिस्तूल, सहा तलवारी, एक चाकू आणि एक खंजीर जप्त करण्यात आला. या शस्त्रांची अंदाजे किंमत ८ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि अवैध धंद्यांचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी पोलीस दल कटिबद्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात अवैध दारू विक्री, जुगार, अमली पदार्थांची तस्करी किंवा अन्य संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असेही पोलीस प्रशासनाने म्हटले आहे.
News - Chandrapur




Petrol Price




