कचरा व्यवस्थापनावर कोट्यवधी खर्च : तरीही गडचिरोलीत कचऱ्याचे ढीग कायम

- दररोज ८ टन कचऱ्याचे आव्हान; दुर्गंधी, आगीचा धोका आणि आरोग्याच्या समस्या वाढल्या
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : पुण्यात कचऱ्याच्या डोंगराखाली दबून नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर राज्यभरातील शहरांमधील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. वाढत्या शहरीकरणामुळे गडचिरोली शहरातही कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, नगर परिषदेकडून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असतानाही प्रत्यक्षात शहरातील विविध भागांसह डम्पिंग ग्राउंड परिसरात कचऱ्याचे ढिगारे दिसून येत आहेत.
उघड्यावर साचलेल्या या कचऱ्यामुळे दुर्गंधी, माशा-डासांचा उपद्रव, आग लागण्याचा धोका आणि साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे. त्यामुळे हा साचणारा कचरा नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत असून, कचरा व्यवस्थापनाच्या प्रभावी नियोजनाची गरज निर्माण झाली आहे.
गडचिरोली शहराचा विस्तार आणि लोकसंख्या वेगाने वाढत आहे. नगर परिषदेच्या माहितीनुसार, शहरात दररोज सुमारे ८ टन ओला व सुका कचरा निर्माण होतो. एवढ्या मोठ्या प्रमाणातील कचऱ्याचे संकलन करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे हे पालिका प्रशासनासमोरील मोठे आव्हान बनले आहे.
कचरा डेपोच्या परिसरात नवीन ले-आऊट आणि निवासी घरे तयार झाल्याने तेथील नागरिकांना दररोज दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. तसेच माशा आणि डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कचऱ्यावर प्रक्रिया मात्र अपुरी -
नगर परिषदेकडून संकलित करण्यात आलेल्या कचऱ्याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण केले जाते. ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीची प्रक्रिया राबविली जाते, तर सुक्या कचऱ्यातील प्लास्टिक, काच आणि धातू वेगळे करून पुनर्वापरासाठी पाठविण्याचा प्रयत्न केला जातो.
मात्र, दररोज निर्माण होणाऱ्या संपूर्ण ८ टन कचऱ्यावर वेळेत प्रक्रिया होत नसल्याने उर्वरित कचरा साचून राहतो. परिणामी, कचरा डेपोमध्ये ढिगारे वाढत आहेत.
नगर परिषदेकडून कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यापासून गांडूळ खताची निर्मिती केली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. शहरातील स्वच्छता राखण्याला प्राधान्य देण्यात येत असून, कचरा प्रक्रिया क्षमता वाढविण्यावर भर दिला जात असल्याचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर यांनी सांगितले.
कचरा व्यवस्थापनासाठी १.७५ कोटींचा खर्च -
शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी नगर परिषदेकडून दरवर्षी १.७५ कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च केला जातो. या निधीतून घंटागाड्या, ट्रॅक्टर, सफाई कामगारांचे वेतन, इंधन आणि कचरा संकलनाच्या विविध कामांवर खर्च केला जातो.
मात्र, एवढा मोठा खर्च करूनही शहरातील कचऱ्याची समस्या पूर्णपणे संपुष्टात आलेली नाही. घरगुती कचऱ्यासोबतच भाजी बाजार, व्यावसायिक दुकाने आणि हॉटेलमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाणही मोठे आहे. यामध्ये प्लास्टिक कचऱ्याचा मोठा वाटा आहे.
पर्यावरण आणि आरोग्याला धोका -
साचलेल्या कचऱ्यामुळे जमिनीतील पाणी दूषित होण्याचा धोका वाढला आहे. तसेच पर्यावरणावरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे. उन्हाळ्यात कचऱ्याच्या ढिगाऱ्यांना रासायनिक प्रक्रियेमुळे किंवा निष्काळजीपणामुळे आग लागण्याच्या घटना घडतात. या आगीमुळे विषारी धूर पसरून नागरिकांना श्वसनाचे आजार, त्वचारोग आणि इतर आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते. याशिवाय डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा प्रसार होण्यासही पोषक वातावरण तयार होते.
नागरिकांचा सहभागही आवश्यक -
शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी केवळ नगर परिषदेची नसून नागरिकांचीही तितकीच महत्त्वाची आहे. नागरिकांनी घरातील ओला आणि सुका कचरा वेगळा करणे, कचरा उघड्यावर न टाकता घंटागाडीत देणे आणि प्लास्टिकचा वापर कमी करणे आवश्यक आहे.
प्रशासनाच्या उपाययोजनांसोबत नागरिकांचा सहभाग वाढल्यासच गडचिरोली शहर खऱ्या अर्थाने स्वच्छ आणि कचरामुक्त होऊ शकते.
News - Gadchiroli




Petrol Price




