महत्वाच्या बातम्या

 चोरट्यांवर चंद्रपूर पोलिसांचा धडक वचक : १९८ जामीनप्राप्त आरोपींची विशेष ओळख परेड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने चंद्रपूर पोलिसांनी मोठी प्रतिबंधात्मक मोहीम राबविली आहे. दरोडा, जबरी चोरी आणि घरफोडी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये न्यायालयातून जामिनावर सुटलेल्या १९८ सराईत आरोपींची विशेष ओळख परेड घेण्यात आली.

सदर ओळख परेड पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या उपस्थितीत पार पडली. या वेळी प्रत्येक आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यात आली. न्यायालयाने घालून दिलेल्या जामीनाच्या सर्व अटी व शर्तींचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देत, भविष्यात कोणत्याही गुन्हेगारी कृत्यात सहभागी होऊ नये, अशी कडक ताकीद पोलिसांनी दिली.

जामीनाच्या अटींचे उल्लंघन करणाऱ्या आरोपींचा जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात प्रस्ताव सादर करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही यावेळी देण्यात आला. तसेच, यापूर्वी कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई न झालेल्या जामीनप्राप्त आरोपींची स्वतंत्र यादी तयार करून त्यांच्याविरुद्ध तातडीने कायदेशीर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना त्यांच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालींवर चोवीस तास लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जामीनावर सुटलेले आरोपी पुन्हा गुन्हेगारीकडे वळू नयेत, यासाठी आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात शांतता, कायदा व सुव्यवस्था कायम राखणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे हे पोलिसांचे प्रमुख उद्दिष्ट असून, गंभीर गुन्ह्यांतील जामीनप्राप्त आरोपींच्या प्रत्येक हालचालीवर यापुढेही बारकाईने लक्ष ठेवले जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई भविष्यातही सुरूच राहणार असल्याचा इशाराही पोलिस प्रशासनाने दिला आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos