प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे योगाला जागतिक स्तरावर मान्यता : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

- पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिन सादरा
- विविध शासकीय कार्यालये, सामाजिक संघटनांचा सहभाग
- हजारो सहभागीतांनी केली सामुहिक योगासने
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : योगा ही भारताची पारंपरीक उपचार पद्धती आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जगाला योगाचे महत्व पटवून दिले आणि या उपचार पद्धतीला जागतिक स्तरावर मान्यता आणि नावलौकिक प्राप्त झाला. आज जगातील बहुतांश देशात योगाचा दैनंदीन जीवनात उपयोग केला जातो, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले.
वर्धा येथील तालुका क्रीडा संकुल येथे जिल्हा प्रशासन, पोलिस अधीक्षक कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षणाधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, माय भारत केंद्र, पतंजली योग समिती व विविध शासकीय कार्यालये, सामाजिक संस्था, संघटनांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते.
कार्यक्रमास जिल्हाधिकारी वान्मथी सी, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय तेली, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी प्रताप वाघमारे, जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम, अशोक कलोडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरीक, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशात असंख्य वर्षांची परंपरा लाभलेल्या योगाचे महत्व संपुर्ण जगाला पटलेले आहे. ही केवळ उपचार पद्धतीच नाही तर तंदुरुस्त शरीर, आरोग्य व आनंदाचा मंत्र देखील आहे. काही संस्था, संघटना योगाच्या प्रचार, प्रसिद्धीसाठी झटत आहे. प्रशासनाने देखील जनजागृती करून योगाचे महत्व नागरिकांना पटवून देण्यासाठी काम करण्याची गरज आहे.
प्रत्येक नागरीकाने प्रत्यक्ष जीवनात जास्तीत जास्त योगाचा अवलंब करणे आवश्यक आहे. यावर्षी पाणी संकट राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे प्रत्येकाने आतापासूनच पाण्याची बचत व त्यादृष्टीने नियोजन करावे, असे पुढे बोलतांना पालकमंत्री डॉ.भोयर म्हणाले.
आयटीआय टेकडी जवळील तालुका क्रीडा संकुलाच्या निसर्गरम्य परिसरात आयोजित जागतिक योग दिन कार्यक्रमाला शहरातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह महिला, मुले, विद्यार्थी विशेषत: ज्येष्ठ नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी वान्मथी सी यांच्यासह सर्व उपस्थितांनी यावेळी सामुहिक योगासने केली.
पतंजली योग समितीचे दामोधर राऊत, मोहन काळे, प्रशांत सावरकर यांनी योगांचे महत्व पटवून सांगण्यासोबतच उपस्थितांकडून प्रात्यक्षिकाद्वारे योगासने करून घेतली. हजारो वर्धेकर उत्साहात योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते.
News - Wardha




Petrol Price




