महत्वाच्या बातम्या

 अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी पोलिसांची धडक मोहीम


- श्वान पथकाकडून वरोऱ्यात एसटीसह खासगी बसेसची तपासणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / वरोरा : शहर व परिसरात अमली पदार्थांच्या सेवनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता, त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी वरोरा पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अमली पदार्थांची वाहतूक व तस्करी रोखण्यासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना केल्या जात असून, त्याचाच एक भाग म्हणून श्वान पथकाच्या माध्यमातून वरोरा येथे एसटी महामंडळाच्या तसेच खासगी बसेसची तपासणी करण्यात आली.

अमली पदार्थांच्या वाढत्या सेवनाचा सर्वाधिक परिणाम युवा पिढीवर होताना दिसून येत आहे. व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे अनेक युवकांचे शैक्षणिक, सामाजिक आणि कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त होत आहे. विशेष म्हणजे अमली पदार्थांच्या सेवनाकडे युवतींचाही कल वाढत असल्याने ही बाब चिंतेचा विषय बनली आहे. युवा पिढीला या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी पोलिसांकडून जनजागृतीवरही भर देण्यात येत आहे.

अमली पदार्थांचे सेवन करू नये, तसेच त्यापासून होणारे शारीरिक व मानसिक दुष्परिणाम समजावून सांगण्यासाठी युवक-युवतींसाठी विविध शिबिरे आणि मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश देत युवा पिढीमध्ये जनजागृती केली जात आहे. मात्र, केवळ प्रबोधनावर अवलंबून न राहता अमली पदार्थांची विक्री आणि तस्करी करणाऱ्यांविरोधात ठोस कारवाई करण्यासही पोलीस प्रशासनाने सुरुवात केली आहे.

बसेसमधून तस्करीचा संशय - 

खासगी तसेच एसटी महामंडळाच्या बसेसमधून अमली पदार्थांची वाहतूक केली जात असल्याचा संशय पोलिसांना असल्याने बसेसची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी श्वान पथकाची मदत घेण्यात आली. श्वान पथकाच्या माध्यमातून बसेसमधील विविध भाग तसेच संशयास्पद साहित्य आणि प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यात आली.

सार्वजनिक वाहतुकीच्या माध्यमातून अमली पदार्थांची वाहतूक होऊ नये, यासाठी पोलिसांकडून बसस्थानक परिसर तसेच बसेसवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. अचानक करण्यात येणाऱ्या या तपासणीमुळे अमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.

तस्करीविरोधात कारवाईचा इशारा - 

अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी आगामी काळातही अशा प्रकारच्या तपासण्या आणि कारवाया सुरू राहण्याची शक्यता आहे. अमली पदार्थांची विक्री, वाहतूक किंवा तस्करी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा पोलिसांचा निर्धार असून, नागरिकांनीही संशयास्पद हालचाली आढळल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

या तपासणी मोहिमेदरम्यान वरोरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध शाखेचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद भस्मे, तसेच संदीप मुळे, मनोज ठाकरे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यामुळे युवा पिढीचे भविष्य धोक्यात येत असताना, पोलिसांकडून जनजागृतीसोबतच तस्करीच्या संभाव्य मार्गांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. श्वान पथकाच्या माध्यमातून बसेसची सुरू करण्यात आलेली तपासणी ही अमली पदार्थांविरोधातील पोलिसांच्या कारवाईतील महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos