महत्वाच्या बातम्या

 हर घर तिरंगा अभियान १७ ऑगस्टपर्यंत : ग्रामपंचायतींमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान विभागाच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ९ ते १७ ऑगस्टदरम्यान हर घर तिरंगा अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या सूचनेनुसार तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये या अभियानाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्यासोबतच नागरिकांमध्ये राष्ट्रध्वजाबद्दल सन्मान व अभिमानाची भावना निर्माण करणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.

अभियानाच्या कालावधीत दररोज ग्रामपंचायत कार्यालयावर राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहे. याशिवाय गावातील प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकविण्याचे आवाहन करण्यात आले असून, सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्यांच्या निवासस्थानीही राष्ट्रध्वज फडकविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनासह लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा या अभियानात सक्रिय सहभाग राहणार आहे.

ग्रामसभेची सुरुवात वंदे मातरम ने - 

हर घर तिरंगा अभियानांतर्गत गावागावांत विविध कार्यक्रम आणि ग्रामसभांचे आयोजन करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांची सुरुवात वंदे मातरम च्या सामूहिक गायनाने करण्यात येणार आहे. यात ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच विविध घटकांचा सहभाग राहणार आहे. गावातील प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरावर तिरंगा फडकवून स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवात सहभागी व्हावे, यासाठी ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती करण्यात येणार आहे. राष्ट्रध्वजाचा सन्मान राखत अभियानात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

गावागावांत देशभक्तीचे वातावरण - 

९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत ग्रामपंचायत कार्यालयांसह नागरिकांच्या घरांवर तिरंगा फडकणार असल्याने गावागावांत देशभक्तीचे वातावरण निर्माण होणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येणाऱ्या या अभियानामुळे नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, देशप्रेम आणि राष्ट्रध्वजाबद्दल आदराची भावना अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.जिल्हा परिषदेच्या निर्देशानुसार सर्व ग्रामपंचायतींनी अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos