वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश : संत तुकाराम महाराज सेवा मंडळाचा उपक्रम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : संत श्री तुकाराम महाराज सेवा मंडळ व पर्यावरण वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री बालाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, बामणी-बल्लारपूर येथे ८ ऑगस्ट रोजी वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये वृक्ष लागवड व वृक्ष संगोपनाची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला बल्लारपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा डॉ. अलकाताई वाढई व डॉ. अनिल वाढई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी शाळेच्या नगराध्यक्षा डॉ. अलकाताई वाढई यांनी शुद्ध हवा आणि शुद्ध पाणी सर्वांना उपलब्ध व्हावे यासाठी जास्तीत जास्त झाडे लावण्याचे आवाहन केले. वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा जपून वापर करण्याची गरज असून, प्रत्येक कुटुंबाने पावसाचे पाणी साठविण्यासाठी घरच्या घरी वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था करावी, असेही त्यांनी सांगितले. पर्यावरणाचे संरक्षण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने त्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. अनिल वाढई यांनी केवळ वृक्षारोपण करणे पुरेसे नसून लावलेल्या प्रत्येक रोपाचे योग्य संगोपन करणे हीदेखील प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगितले. झाडांमुळे वातावरणातील प्रदूषण कमी होण्यास मदत होते. तसेच मानवाला शुद्ध हवा मिळण्याबरोबरच पशुपक्ष्यांना आश्रय व खाद्य उपलब्ध होते. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
संत श्री तुकाराम महाराज सेवा मंडळाचे अध्यक्ष श्रीधर फटाले यांनी पर्यावरण संवर्धनासाठी मंडळाच्या माध्यमातून सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. पर्यावरण वाहिनीचे अध्यक्ष मोहम्मद शरीफ यांनीही वृक्षसंवर्धनाचे महत्त्व विशद करत नागरिकांनी पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोहर माडेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राचार्या पंधरे यांनी केले. यावेळी श्रीमती सत्यशीला साळवे, चंद्रभान जोगी, गजानन घुगल, उद्धवराव धोटे, अनुप कुठे माटे, युगराज बोबडे, विनायकराव साळवे, सूर्यकांत साळवे, पांडुरंग जरीले, डॉ. अशोक घुंगरूळकर, नितीन वरारकर, प्रशांत मेश्राम, सुमित कौरासे, निखिल तावाडे, दीपक धोपटे, सुधीर कोरडे, वाजिद खान, एल. के. बल्की, निकेत कोरडे, प्रवीण कुंभारे, राजेश वाटटे, संघपाल रामटेके, संजय कागदेलवार यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
News - Chandrapur




Petrol Price




