महत्वाच्या बातम्या

 चारगाव तलावात बुडून तरुणाचा मृत्यू : दोन दिवसांच्या शोधानंतर सापडला मृतदेह


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या एका ३० वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मोहपा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चारगाव शिवारात घडली. सोमवारी २० दुपारी घडलेल्या या घटनेनंतर सुरू असलेल्या शोध मोहिमेत मंगळवारी २१ दुपारी तरुणाचा मृतदेह शोधण्यात यश आले.

अमित नानेश्वर वखारे ३० वर्षे रा. बायपास रोड, ब्राह्मणी, कळमेश्वर असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमित हा आपल्या मित्रांसोबत चारगाव शिवारातील तलावावर पोहण्यासाठी गेला होता. पोहत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात गेला आणि गटांगळ्या खाऊ लागला.

अमित बुडत असल्याचे लक्षात येताच त्याच्या मित्रांनी आरडाओरड करून त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. त्यानंतर मित्रांनी तातडीने मोहपा पोलिसांना घटनेची माहिती दिली.

माहिती मिळताच मोहपा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तलावात शोधमोहीम सुरू केली. मात्र, अंधार पडल्याने सोमवारी रात्री शोधकार्य थांबविण्यात आले. मंगळवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. अखेर दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने अमितचा मृतदेह शोधण्यात यश आले.

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी मोहपा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास ठाणेदार ईश्वर हनुवते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

दरम्यान, अमित हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे आई-वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अमितच्या आकस्मिक मृत्यूमुळे वखारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.पावसाळ्याच्या दिवसांत नदी, तलाव, डोह आणि बांधांमध्ये पाण्याची पातळी व खोली वाढलेली असते.

त्यामुळे अल्पवयीन मुले, तरुण तसेच नागरिकांनी अंघोळीसाठी किंवा पोहण्यासाठी अशा जलस्रोतांमध्ये उतरू नये, असे आवाहन मोहपा पोलिस ठाण्याचे ठाणेदार ईश्वर हनुवते यांनी केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos