महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज वर्धा दौऱ्यावर


- दुष्काळग्रस्त भागाची पिक पाहणी; जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत परिस्थितीचा घेणार आढावा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे रविवार, २७ सप्टेंबर रोजी वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यात निर्माण झालेल्या संभाव्य दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दौऱ्यादरम्यान मंत्री बावनकुळे दुष्काळग्रस्त भागातील पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांच्या परिस्थितीची माहिती घेणार आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत दुष्काळजन्य परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नियोजित दौऱ्यानुसार, २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता ते दुष्काळग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. या पाहणीदरम्यान पिकांची सद्यस्थिती, पावसाचे प्रमाण, पिकांवर झालेला परिणाम तसेच शेतकऱ्यांसमोरील अडचणी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली जाणार आहे.
त्यानंतर दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा येथे दुष्काळजन्य परिस्थितीबाबत आयोजित आढावा बैठकीस ते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, पिकांची स्थिती आणि प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला जाणार आहे. संबंधित विभागांचे अधिकारी या बैठकीस उपस्थित राहून जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती सादर करतील.
दरम्यान, शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत या दौऱ्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष पिक पाहणी आणि अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीमुळे जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेण्यास मदत होणार आहे.आढावा बैठक पूर्ण झाल्यानंतर दुपारी 1 वाजता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे वर्धा येथून यवतमाळकडे प्रयाण करणार आहेत, अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली आहे.




Petrol Price




