महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली महिला व बाल रुग्णालयातील अव्यवस्था : आभा ॲप प्रक्रियेमुळे रुग्ण त्रस्त, बालरोग विभागातही गैरसोयींच्या तक्रारी


- दवाखान्यात रुग्णांच्या गैरसोयी संबंधित लवकरच आढावा घेण्यात येईल.. मा.खा.डॉ. अशोकजी नेते

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालयात ओपीडीची चिठ्ठी काढण्यासाठी आभा (ABHA) ॲपची प्रक्रिया पूर्ण करताना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना तासन्तास रांगेत थांबावे लागत असून लहान बालके, गर्भवती महिला व ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

गडचिरोली हा आदिवासीबहुल, दुर्गम व आकांक्षी जिल्हा आहे. जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागातील नागरिकांकडे स्मार्टफोन नसतो किंवा इंटरनेटचा वापर करण्याची पुरेशी माहिती नसते. अशा परिस्थितीत आभा ॲप डाउनलोड करून नोंदणी करण्याची प्रक्रिया अनेकांसाठी अत्यंत कठीण ठरत आहे. परिणामी, ओपीडीची साधी चिठ्ठी काढण्यासाठीही नागरिकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत असल्याची तक्रार रुग्णांकडून व्यक्त होत आहे.

रुग्णालय प्रशासनाने आभा ॲपबाबत स्पष्ट माहिती देणारे फलक प्रवेशद्वारावर लावावेत, तसेच स्वतंत्र मदत कक्ष सुरू करून कर्मचाऱ्यांमार्फत नागरिकांना प्रत्यक्ष सहकार्य करावे, अशी मागणी होत आहे. यामुळे रुग्णांचा वेळ वाचून अनावश्यक गर्दी टाळण्यास मदत होईल, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.

याशिवाय, बालरोग तज्ज्ञांच्या कक्ष क्रमांक २९ मध्येही रुग्णांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागत असल्याचे दिसून आले. काही पालकांच्या म्हणण्यानुसार, डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे लहान बालकांना अर्धा ते एक तास डॉक्टरांच्या प्रतीक्षेत बसावे लागले. आजारी बालकांच्या रडण्यामुळे पालकांची चिंता अधिक वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच, उपस्थित नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कक्ष क्रमांक २९ समोर एक सुज्ञ व्यक्ती मोबाईलवर आरोग्याच्या संबंधित  बोलत असताना संबंधित डॉक्टरांनी त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचे सांगण्यात आले. या वेळी फोन कुणाचाही असो, मला काहीच लेन देन नाही अशा आशयाचे वक्तव्य झाल्याचा आरोप काही उपस्थितांनी केला. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

रुग्णालयात उपचारासाठी येणारे नागरिक आधीच मानसिक तणावाखाली असतात. त्यामुळे डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णांशी संयम, सौजन्य आणि संवेदनशीलतेने संवाद साधणे आवश्यक असल्याची भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली.

दरम्यान, या संपूर्ण प्रकाराची माहिती माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांना मिळताच त्यांनी याची गंभीर दखल घेतली. आरोग्य सेवांबाबत रुग्णांची कोणतीही गैरसोय खपवून घेतली जाणार नाही. महिला व बाल रुग्णालयातील अडचणी, आभा ॲपमुळे निर्माण झालेल्या समस्या तसेच रुग्णांना भेडसावणाऱ्या गैरसोयींचा लवकरच आढावा घेऊन संबंधित प्रशासनाशी चर्चा करण्यात येईल. रुग्णांना सुलभ, दर्जेदार आणि वेळेवर आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे, अशी भूमिका डॉ. अशोकजी नेते यांनी व्यक्त केल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली.

रुग्णांच्या अडचणी लक्षात घेऊन आभा ॲप प्रक्रियेसाठी प्रभावी मदत व्यवस्था उभारणे, ओपीडीतील गर्दी कमी करण्यासाठी नियोजन करणे, डॉक्टरांची वेळेवर उपस्थिती सुनिश्चित करणे आणि रुग्णांशी संवेदनशील व सन्मानपूर्वक वर्तन करणे यासाठी रुग्णालय प्रशासनाने तातडीने आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos