महत्वाच्या बातम्या

 शिलाई मशीन वाटपावरून विसापूर ग्रामपंचायत वादाच्या भोवऱ्यात : प्रशिक्षणार्थी महिलांचा निषेध


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून मागासवर्गीय १८ गरजू महिलांना १०० टक्के अनुदानावर शिलाई मशीनचे वितरण केल्यानंतर गावात वाद निर्माण झाला आहे. शिलाई प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अनेक महिलांनी वाटप प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ग्रामपंचायतीविरोधात नाराजी व्यक्त केली असून, सर्व पात्र प्रशिक्षणार्थींना शिलाई मशीन देण्याची मागणी केली आहे.

ग्रामपंचायतीमार्फत गावातील सुमारे १४५ महिलांना शिलाई प्रशिक्षण देण्यात आले होते. प्रशिक्षणानंतर सर्व महिलांना शिलाई मशीन मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, केवळ १८ महिलांनाच लाभ मिळाल्याने उर्वरित १२७ प्रशिक्षणार्थी महिलांनी संताप व्यक्त केला आहे. लाभार्थी निवड करताना पारदर्शकता ठेवण्यात आली नसून, निवडक व्यक्तींनाच लाभ देण्यात आल्याचा आरोप महिलांनी केला आहे.

यासंदर्भात संतप्त महिलांनी ग्रामपंचायत प्रशासक व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून लाभार्थी निवडीसंदर्भातील ठरावाची प्रत उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच शिलाई प्रशिक्षण घेतलेल्या सर्व पात्र महिलांना शिलाई मशीनचे वितरण करण्यात यावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदन देताना शेतकरी-शेतमजूर महिला समितीच्या अध्यक्षा आशा काळे, माजी ग्रामपंचायत सदस्या शारदा डाहुले, सुरेखा इटनकर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

ग्रामपंचायत प्रशासक वर्षा कुळमेथे यांनी सांगितले की, १५ व्या वित्त आयोगाच्या उपलब्ध निधीतून सध्या १८ शिलाई मशीनचीच तरतूद होती. प्राप्त अर्जांची छाननी करून पात्र व गरजू महिलांची निवड करण्यात आली आहे. उर्वरित पात्र लाभार्थ्यांना चालू आर्थिक वर्षात निधी उपलब्ध होताच शिलाई मशीन देण्याची कार्यवाही करण्यात येईल.





  Print






News - Chandrapur




Related Photos