महत्वाच्या बातम्या

 खर्रा खरेदीच्या वादातून ट्रॅव्हल्स कंडक्टरवर हातोडीने हल्ला : चौघांविरुद्ध गुन्हा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : खर्रा खरेदीच्या किरकोळ वादातून एका ट्रॅव्हल्स कंडक्टरवर हातोडीने हल्ला करून मारहाण केल्याची घटना रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

प्राप्त माहितीनुसार, मोनू प्रल्हाद गुरनुले (वय २३) रा. इंदिरानगर, पडोली, चंद्रपूर हे डी.एन.आर. ट्रॅव्हल्समध्ये  कंडक्टर म्हणून कार्यरत आहेत. २३ जून रोजी मध्यरात्री सुमारे १२.१५ वाजताच्या सुमारास ते चालक रामकृष्ण कुबडे यांच्यासह ट्रॅव्हल्स वॉशिंगसाठी नागपूर रोडकडे जात होते.

दरम्यान रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ वाहन थांबवून खर्रा घेण्याचा प्रयत्न केला असता, एका व्यक्तीने ५० रुपयांचा खर्रा आणून दिला. खर्रा महाग असल्याचे सांगून तो परत करण्यास सांगितल्यानंतर संबंधित व्यक्तीसोबत शाब्दिक वाद झाला. त्यानंतर गुरनुले व चालक तेथून निघून गेले.

मात्र वडगाव फाट्याजवळ सिल्व्हर रंगाच्या सुझुकी बलेनो कार क्रं. एमएच ४९ बीबी २७७६ ने  ट्रॅव्हल्सचा रस्ता अडविला. कारमधून उतरलेल्या चार जणांनी गुरनुले यांच्यावर धावून जात शिवीगाळ करत मारहाण केली. यातील संकेत नावाच्या व्यक्तीने हातोडीने त्यांच्या कमरेवर वार केले तसेच त्याच्या इतर साथीदारांनीही हाताबुक्यांनी मारहाण केली.

घटनास्थळी नागरिकांची गर्दी होत असताना पोलिसांचे वाहन येताना दिसल्याने आरोपी तेथून पसार झाले. या घटनेत जखमी झालेल्या मोनू गुरनुले यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात संकेत व त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध मारहाण, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos