शेतकऱ्यांनी किटकनाशके फवारणी करतांना काळजी घ्यावी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : शेतकऱ्यांनी पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करतांना स्वत:ची सुरक्षितता राखणे अत्यंत गरजेचे आहे. योग्य काळजी घेतल्यास विषबाधा टाळता येऊ शकतो आणि पिकांचेही रक्षण होते. यासाठी शेतकऱ्यांनी पिकावर किटकनाशके फवारणी करतांना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कीटकनाशके नेहमी परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करावीत. कृषी अधिकाऱ्यांच्या किंवा कृषी दर्शनी पुस्तिकेतील शिफारशीनुसारच औषधे निवडावीत. औषधांची पाकिटे किंवा बाटल्या खरेदी करताना त्यावर उत्पादनाची व अंतिम तारीख नक्की तपासावी. कीटकनाशकाचे तांत्रिक नाव आणि त्याचे प्रमाण पॅकेटवर नमूद केलेले आहे का, याची खात्री करावे.
फवारणी करतांना संपूर्ण शरीर झाकणारे कपडे (उदा. पूर्ण बाह्यांचा शर्ट आणि पॅन्ट), हातमोजे, मास्क, डोक्याला टोपी, गॉगल आणि बूट यांचा वापर करावा. फवारणीच्या द्रावणाचा वास घेऊ नका आणि द्रावण नेहमी काडीच्या साहाय्याने ढवळावे. फवारणी करतांना वाऱ्याच्या दिशेने फवारणी करावी, जेणेकरून औषधाचे तुषार अंगावर उडणार नाहीत. फवारणी सुरू असताना खाणे, पिणे, किंवा तंबाखू, धूम्रपान करणे टाळावे. पंपाचे नोझल बंद झाल्यास ते तोंडाने अजिबात साफ करू नये, त्यासाठी तारेचा वापर करावा. एकाच गटातील कीटकनाशकाचा वारंवार वापर करू नका, अन्यथा किडींमध्ये औषधांविषयी प्रतिकार क्षमता वाढू शकते.
फवारणी पूर्ण झाल्यावर साबणाने हात पाय आणि संपूर्ण शरीर स्वच्छ धुवावे. फवारणीसाठी वापरलेले कपडे इतर कपड्यांपासून वेगळे धुवावेत. कीटकनाशकांचे रिकामे डबे किंवा बाटल्या शेतात फेकून देऊ नका किंवा इतर कामांसाठी वापरू नका. त्या बाटल्या विहिरी किंवा नदीपासून दूर जमिनीत खोल खड्डा करून नष्ट कराव्यात. विषबाधा झाल्यास बाधित व्यक्तीला ताबडतोब फवारणीच्या जागेपासून दूर, मोकळ्या व सावलीच्या ठिकाणी नेऊन प्रथमोपचार द्यावेत. विषबाधेची लक्षणे दिसल्यास अजिबात वेळ न घालवता डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे हिंगणघाट येथील उपविभागीय कृषी अधिकारी स्वप्नील तोरणे यांनी कळविले आहे.
News - Wardha




Petrol Price




