२३.७४ लाखांच्या घरफोडीचा बल्लारपूर पोलिसांकडून पर्दाफाश : सात आरोपी जेरबंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत २३.७४ लाखांच्या घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत सात आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेल्या मालापैकी सुमारे २१ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, २७ जून २०२६ रोजी शिवाजी वॉर्ड, बल्लारपूर येथील रहिवासी राजवीरसिंह धनसिंह सनवाल (वय ६०) यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू असा २३ लाख ७४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७११/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(४) व ३०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि गुप्त माहितीच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करून आरोपी रोहित कनाई मंडल (वय २३), रा. अष्टभुजा वॉर्ड, चंद्रपूर याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदार शुभम जयसिंग उईके (वय २३) याच्यासह घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानंतर शुभम उईके यालाही मध्यरात्री चंद्रपूर येथून ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. त्यानेही गुन्ह्याची कबुली दिली.
चौकशीत आरोपींनी चोरीचा काही माल विविध व्यक्तींना विकल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी अब्दुल हमीद कादिर शेख, गन्नी उर्फ जनार्धन रमेश सोनी, संजू चंदेश्वर सोनी, राजेश महेश सोनी आणि हनमंत जगन्नाथ बाबर या पाच जणांना ताब्यात घेतले. या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी सुमारे २१ लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला असून उर्वरित मालाचा शोध सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्या नेतृत्वात पोउपनि उमेश जोगदंड, पोहवा संतोष पंडीत, लालू यादव, पुरुषोत्तम चिकाटे, विकास जुमनाके, सत्यवान कोटनाके, पंकज शिंदे, भास्कर चिंचवलकर, नपोअं सचिन आलेवार, पोअं महेश कुकुडकर, लखन चव्हाण, वैभव गाडगे, शरदचंद्र कारूष, मिलिंद आत्राम, मपोअं अनिता नायडू यांनी केले.
News - Chandrapur




Petrol Price




