राजुरा येथील डॉक्टरांच्या घरातून ३.६० लाखांची चोरी : अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : राजुरा शहरातील एका नामांकित डॉक्टरांच्या घरातून तब्बल ३ लाख ६० हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध राजुरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
डॉ. हरिदास कोरसुजीत कातकर (६०) हे राजुरा येथील शिवाजी वॉर्ड परिसरात पत्नीसमवेत वास्तव्यास आहेत. त्यांचे स्वतःचे कातकर हॉस्पिटल असून ते व त्यांची पत्नी दोघेही डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या मुलासाठी ३ लाख ६० हजार रुपयांची रोकड घरातील बेडरूममध्ये ठेवलेल्या बॅगमध्ये ठेवली होती. तसेच हॉस्पिटलमध्ये जमा होणारी रक्कमही ते वेळोवेळी त्याच बॅगमध्ये ठेवत होते.
२६ मे रोजी सकाळी सुमारे १० वाजता डॉ. कातकर व त्यांची पत्नी घराला कुलूप लावून हॉस्पिटलमध्ये गेले होते. सायंकाळी ५ वाजता घरी परत आल्यानंतर त्यांनी हॉस्पिटलमधील जमा रक्कम नेहमीप्रमाणे बॅगमध्ये ठेवली होती. त्यावेळी ३.६० लाख रुपयांची रक्कम सुरक्षित असल्याचे त्यांना दिसून आले.
यानंतर सायंकाळी पुन्हा एका रुग्णाचा फोन आल्याने दोघेही हॉस्पिटलमध्ये गेले. रात्री दरम्यान डॉ. कातकर घरी परतल्यानंतर त्यांनी पुन्हा बॅग तपासली असता मुलाला पाठविण्यासाठी ठेवलेली ३ लाख ६० हजार रुपयांची रोकड गायब असल्याचे निदर्शनास आले. घरात सर्वत्र शोध घेतल्यानंतरही रक्कम मिळून आली नाही.
दरम्यान, अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून बॅगमधील रोकड चोरून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे राजुरा शहरात खळबळ उडाली असून पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक बाबींच्या आधारे तपास करीत आहेत.
News - Chandrapur




Petrol Price




