बल्लारपूर, जिवती, ब्रह्मपुरीतील शेतकऱ्यांसाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पाठपुरावा


- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; दुष्काळग्रस्त यादीत तीनही तालुक्यांचा समावेश करण्याची मागणी - प्रत्यक्ष पीक पाहणी, ग्राऊंड ट्रुथिंग व पंचनाम्यांच्या आधारे मदतीचे निर्देश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, जिवती आणि ब्रह्मपुरी या तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील वर्षा निवासस्थानी भेट घेऊन या तीनही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश अतिरिक्त मुख्य सचिव, मदत व पुनर्वसन विभागाला दिले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात खरीप हंगाम २०२६ मध्ये पावसाचे अनिश्चित आणि असमान वितरण, पिकांची चिंताजनक अवस्था, पाण्याची उपलब्धता तसेच शेतकऱ्यांवर वाढत असलेला आर्थिक ताण या पार्श्वभूमीवर दुष्काळी परिस्थितीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील १२ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश झाल्यानंतर बल्लारपूर, जिवती आणि ब्रह्मपुरी या तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांनाही समान निकषांवर मदत मिळावी, यासाठी मुनगंटीवार यांनी हा मुद्दा थेट मुख्यमंत्र्यांसमोर मांडला.
प्रत्यक्ष परिस्थिती तपासण्याची मागणी -
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात मुनगंटीवार यांनी तीनही तालुक्यांतील पर्जन्यमान, पिकांची सद्यस्थिती, पाण्याची उपलब्धता आणि प्रत्यक्ष दुष्काळी परिस्थितीचा वस्तुनिष्ठ आढावा घेण्याची मागणी केली. केवळ उपलब्ध आकडेवारी किंवा पूर्वनिश्चित निकषांच्या आधारे निर्णय न घेता शेतकऱ्यांच्या शेतातील प्रत्यक्ष परिस्थितीची पडताळणी करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान किती झाले आहे, पाण्याची उपलब्धता किती आहे आणि दुष्काळाचा प्रत्यक्ष परिणाम कोणत्या भागात किती प्रमाणात झाला आहे, याचे मूल्यांकन करून त्यानुसार पुढील निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
ग्राऊंड ट्रुथिंग, पीक पाहणी व पंचनाम्यांवर भर -
मुनगंटीवार यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्राऊंड ट्रुथिंगच्या माध्यमातून प्रत्यक्ष परिस्थिती तपासण्यावर, नव्या पीक पाहणी पद्धतीद्वारे पिकांची स्थिती जाणून घेण्यावर तसेच आवश्यकतेनुसार पंचनामे करण्यावर भर दिला आहे.
प्रत्यक्ष पाहणी आणि पंचनाम्यांमधून दुष्काळाची तीव्रता व पिकांचे नुकसान स्पष्ट झाल्यानंतर त्याआधारे पुढील आवश्यक निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. दुष्काळाची प्रत्यक्ष झळ पोहोचलेल्या पात्र शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले जाऊ नये, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश अतिरिक्त मुख्य सचिव, मदत व पुनर्वसन विभागाला देण्यात आले आहेत. यामुळे बल्लारपूर, जिवती आणि ब्रह्मपुरी या तीन तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याबाबत प्रत्यक्ष परिस्थितीच्या नव्याने पडताळणीचा मार्ग खुला झाला आहे.
दुष्काळग्रस्त म्हणून समावेश झाल्यास विविध सवलतींचा लाभ -
बल्लारपूर, जिवती आणि ब्रह्मपुरी या तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश झाल्यास पात्र शेतकरी व नागरिकांना शासनाच्या नियमानुसार विविध सवलती व मदतीचा लाभ मिळू शकतो. यामध्ये वीज बिलात सवलत, वीजजोडणी खंडित न करणे, विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात सवलत, पाणीपुरवठ्याशी संबंधित उपाययोजना तसेच पीक नुकसानीनुसार मदत व नुकसानभरपाई यांसारख्या उपाययोजनांचा समावेश आहे.मात्र, या सवलती व मदतीचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी शासनाच्या संबंधित निकषांनुसार दुष्काळग्रस्त परिस्थितीचे मूल्यांकन आणि पुढील प्रशासकीय निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
कागदावरील आकडेवारीपेक्षा शेतातील परिस्थिती महत्त्वाची -
शेतकऱ्याच्या शेतात संकट किती आहे, हे कागदावरील आकडेवारीपेक्षा त्याच्या बांधावर जाऊनच समजू शकते. त्यामुळे बल्लारपूर, जिवती आणि ब्रह्मपुरीतील शेतकऱ्यांना केवळ यादीतून वगळले गेले म्हणून दुष्काळी मदतीपासून वंचित ठेवले जाऊ नये. ग्राऊंड ट्रुथिंग, पीक पाहणी आणि पंचनाम्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष परिस्थिती समोर यावी आणि दुष्काळाची झळ पोहोचलेल्या प्रत्येक पात्र शेतकऱ्याला मदत मिळावी, हीच आपली भूमिका आहे, असे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाची तातडीने दखल घेत संबंधित विभागाला निर्देश दिल्याबद्दल मुनगंटीवार यांनी त्यांचे आभार मानले.दरम्यान, प्रत्यक्ष पाहणी, पीक मूल्यांकन आणि पंचनाम्यांनंतर बल्लारपूर, जिवती आणि ब्रह्मपुरीतील दुष्काळी परिस्थितीचे स्वरूप स्पष्ट होणार असून, त्यानुसार शासनाकडून पुढील निर्णय अपेक्षित आहे. या प्रक्रियेकडे तीनही तालुक्यांतील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.




Petrol Price




