मान्सून पूर्व तयारीचे सर्व विभागांनी नियोजन करावे : जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
- मान्सून पूर्व तयारी आढावा बैठक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : मान्सून पूर्व तयारीचा आढावा घेतांना या कालावधीत अचानक उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला आळा घालण्यासाठी प्रत्येक विभागाची जबाबदारी महत्वाची आहे. मान्सून कालावधीतील संभाव्य धोका लक्षात घेता सर्व विभागांनी समन्वयाने नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सून पुर्व परिस्थितीची आढावा बैठक आज नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आली होती, या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी सुनिल विंचनकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व विविध विभागाचे अधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होते.
अप्पर जिल्हाधिकारी विंचनकर म्हणाले, मान्सून पुर्व कालावधीत सर्व विभागांनी नैसर्गिक आपत्तीचे नियोजन करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात नदीकाठावरील गावे पूर परिस्थितीने बाधित होतात व पूराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील गावांचा संपर्क तुटतो या गावांमध्ये संभाव्य पूर परिस्थतीमध्ये नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी जागा शोधून ठेवाव्यात. उंच जागा, पर्यायी मार्ग, राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था व औषध साठा उपलब्ध ठेवावा. यासाठी उपविभागीय अधिकारी यांनी गावांना भेट देवून पाहणी करावी. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधोपचार व्हावा यासाठी आरोग्य विभागाने नियोजन करावे. पावसाळ्यापुर्वी नगरपरिषद, नगरपंचायत व ग्रामपंचायतीने आपल्या क्षेत्रातील नाले, नाली साफसफाईची कामे करावी. सोबतच पिण्याच्या पाण्याचे निर्जंतूकीकरण करावे. नॅशनल हायवेमुळे नैसर्गिक पाण्याचा निचरा होत नाही. नैसर्गिक पाण्याचा निचरा होण्यासाठी पाणी साचलेल्या ठिकाणचे मार्ग मोकळे करण्यात यावे. गोसेखूर्द प्रकल्पाचे पाणी पातळीवर विशेष लक्ष देवून संजय सरोवर व बावनथडी प्रकल्प यांच्याशी संर्पकात राहण्याच्या त्यांनी सुचना दिले.
पोलीस विभागाने जिर्ण पुलावर बॅरीकेटींग करणे व वाहतुकीला आळा घाण्याबाबत, विद्युत विभागाने मान्सून पुर्व कामे करुन घेण्याबाबत, आरोग्य विभागाने औषध साठा उपलब्ध करुन देण्याबाबत, पुरवठा विभागाने पूर परिस्थितीत बाधित होणाऱ्या गावांकरीता आगाऊ धान्य वितरणाबाबत नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.
News - Bhandara