तूर खरेदीकरीता ६ मार्चपर्यंत नोंदणी करा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : नाफेडतर्फे आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत हंगाम २०२२-२३ मध्ये तूर खरेदीस केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार २१ जानेवारी २०२३ पासून तूर खरेदीकरीता शेतकरी नोंदणी सुरू झाली असून नोंदणीची अंतिम मुदत ६ मार्च २०२३ पर्यंत असणार आहे.
शेतकऱ्यांनी नोंदणी करतांना सातबारा, बँकेचे पासबुक, आधार कार्ड, ऑनलाइन पीकपेरा व नमुना आठ-अ प्रमाणपत्र स्कॅन करून नोंदणी करणे आवश्यक आहे. शासनाने दिलेल्या कालावधीमध्ये शेतकरी नोंदणी होणार असल्यामुळे रोजच्या रोज घेतलेले अर्ज त्याच दिवशी भरणा करण्यास कळविण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना हमीभावाने तूर विकता येणार आहे.
तूर खरेदीसाठी पाच खरेदी केंद्रास मंजुरी देण्यात आली असून यामध्ये चंद्रपूर अंतर्गत पोंभुर्णा खरेदी केंद्र व सावली तालुका, राजुरा खरेदी केंद्र अंतर्गत बल्लारपूर, गोंडपिपरी व मूल तालुका, चिमूर अंतर्गत ब्रह्मपुरी, सिंदेवाही व नागभीड तालुका, गडचांदूर खरेदी केंद्रांतर्गत कोरपना व जिवती तालुका तर वरोरा अंतर्गत भद्रावती तालुका खरेदी केंद्रास नोंदणीसाठी जोडण्यात आले आहे, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी संजय हजारे यांनी कळविले आहे.
News - Chandrapur




Petrol Price




