महत्वाच्या बातम्या

 रानडुकरांच्या कळपाचा शेतकऱ्यांवर हल्ला : गोरेगाव तालुक्यात ९ शेतकरी जखमी


- कलपाथरी, पालेवाडा येथील घटनांनी शेतकऱ्यांमध्ये भीती; वन विभागाकडे कायमस्वरूपी बंदोबस्ताची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यांवर रानडुकरांच्या कळपाने हल्ला केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये गोरेगाव तालुक्यातील ९ शेतकरी जखमी झाले. बुधवारी सकाळच्या सुमारास कलपाथरी आणि पालेवाडा येथील शेतशिवारात घडलेल्या या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, सकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास कलपाथरी येथील शेतकरी राधेश्याम शेगो राऊत ४८ वर्षे यांच्या शेतात मशागतीचे काम सुरू होते. यावेळी झुडपात दबा धरून बसलेल्या रानडुकराने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात राधेश्याम शेगो राऊत यांच्यासह प्रदीप दाजीबा राऊत ३५ वर्षे आणि जितेंद्र चैत्राम गावराने ३० वर्षे हे जखमी झाले.

रानडुकराच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील इतर शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी शेतकऱ्यांना रानडुकराच्या तावडीतून सोडवून तातडीने ग्रामीण रुग्णालय, गोरेगाव येथे दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर राधेश्याम राऊत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना सिटीस्कॅन व पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, गोंदिया येथे हलविण्यात आले. तर प्रदीप राऊत आणि जितेंद्र गावराने यांच्यावर गोरेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, सकाळी सुमारे ९ वाजताच्या सुमारास पालेवाडा येथील शेतशिवारात रानडुकराने पुन्हा हल्ला केला. या घटनेत उस्मानभाई केशवराव राखडे ५० वर्षे लालाजी धोमा बागडे  ४५ वर्षे आणि धीरज लालाजी बागडे २२ वर्षे यांच्यासह अन्य शेतकरी जखमी झाले. जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, गोरेगाव येथे दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

रानडुकरांचा वाढता उपद्रव -
गोरेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये रानडुकरांकडून धान, मका तसेच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यापूर्वीही शेतकऱ्यांनी रानडुकरांच्या वाढत्या उपद्रवाबाबत तक्रारी केल्या आहेत. मात्र, अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना झाल्या नसल्याने आता पिकांच्या नुकसानीसोबतच शेतकऱ्यांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे.

रानडुकरांच्या हल्ल्याच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, वन विभागाने विशेष मोहीम राबवून रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

लोकप्रतिनिधींनी घेतली जखमींची भेट -
घटनेची माहिती मिळताच काँग्रेस तालुका अध्यक्ष जगदीश येरोला, जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती डॉ. लक्ष्मण भगत, जिल्हा परिषद सदस्य शशीभाऊ भगत तसेच पंचायत समिती गोरेगावचे माजी सभापती मनोज बोपचे यांनी ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली.

यावेळी त्यांनी जखमी शेतकऱ्यांची विचारपूस करून त्यांना धीर दिला. तसेच शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी आणि वन विभागाने रानडुकरांच्या वाढत्या उपद्रवावर प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली.

जखमी शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची मागणी -
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींना शासनाच्या प्रचलित नियमांनुसार आर्थिक साहाय्य देण्याची तरतूद आहे. त्यामुळे दोन्ही घटनांचा तातडीने पंचनामा करून जखमी शेतकऱ्यांना नियमानुसार आर्थिक मदत मंजूर करावी, तसेच परिसरात वन विभागाची गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

याबाबत आमगाव वनपरिक्षेत्र अधिकारी श्रेजल आखरे यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच वन विभागाने आवश्यक कार्यवाही सुरू केली आहे. जखमी शेतकऱ्यांवर उपचार सुरू असून, शासनाच्या नियमानुसार जेवढी आर्थिक मदत देणे शक्य आहे तेवढी मदत दिली जाईल. यासाठी आवश्यक पंचनामा आणि प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.






  Print






News - Gondia




Related Photos