महत्वाच्या बातम्या

 चंद्रपुरात एआयएमआयएम नगरसेवकावर जीवघेणा हल्ला : राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट परिसरात शनिवारी २५ जुलै रोजी उशिरा रात्री एआयएमआयएमचे नगरसेवक अजहर शेख यांच्यावर झालेल्या कथित जीवघेण्या हल्ल्यामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अजहर शेख यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू असून, या प्रकरणाची शहर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

घटनेनंतर माध्यमांशी बोलताना नगरसेवक अजहर शेख यांनी आपल्या विजयाचा राग मनात ठेवून विरोधकांनी हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप केला. महापालिका निवडणुकीतील आपल्या विजयाचा सूड उगवण्यासाठी हा कट रचण्यात आल्याचा दावा करत त्यांनी काँग्रेसशी संबंधित काही कार्यकर्त्यांवर तसेच निवडणुकीतील प्रतिस्पर्धी काँग्रेस नेते सोहेल शेख रजा यांच्यावर थेट आरोप केला. आपल्या जीवितास काही धोका झाल्यास त्याला राजकीय विरोधक जबाबदार राहतील, असेही त्यांनी म्हटले.

प्राप्त माहितीनुसार, शनिवारी रात्री अजहर शेख हे जटपुरा गेट परिसरातील बिर्याणी हॉटेलमध्ये बसले असताना काही व्यक्ती तेथे आल्या. सुरुवातीला शाब्दिक वाद झाला आणि त्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. हल्लेखोरांची संख्या १५ ते १६ असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे.

दरम्यान, स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला एका व्यक्तीसोबत झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. हॉटेलमधून संबंधित व्यक्तीला बाहेर काढल्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये मारहाण झाली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी मध्यस्थी करत भांडण सोडविण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हल्लेखोरांची संख्या तसेच घटनेमागील नेमके कारण याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.

या घटनेला वैयक्तिक वादाचे स्वरूप होते की त्यामागे राजकीय वैमनस्य कारणीभूत होते, याबाबत विविध तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. मात्र, नगरसेवक अजहर शेख यांनी हा हल्ला राजकीय हेतूने झाल्याचा गंभीर आरोप केला असून, काँग्रेस नेत्याचे नाव घेतल्याने या प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे.

शहर पोलिसांनी घटनेची नोंद घेत तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची साक्ष तसेच इतर पुराव्यांच्या आधारे हल्ल्याचे नेमके कारण आणि जबाबदार व्यक्तींची भूमिका तपासली जात आहे. पोलिसांच्या तपासानंतरच या प्रकरणातील सत्य परिस्थिती स्पष्ट होणार आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos