महत्वाच्या बातम्या

 शटर वाकवून ज्वेलरी शॉपमध्ये चोरी : १.५४ लाखांचे दागिने लंपास


- तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद; बुटीबोरी शहरातील मेन रोडवरील गुरुकृपा ज्वेलर्समध्ये पहाटेची घटना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : बंद असलेल्या ज्वेलरी शॉपचे शटर वाकवून आत प्रवेश करत चोरट्यांनी १ लाख ५३ हजार ७९० रुपये किमतीचे चांदी व बेन्टेक्सचे दागिने लंपास केले. बुटीबोरी शहरातील मेन रोडवर असलेल्या हिवसे कॉम्प्लेक्समधील गुरुकृपा ज्वेलर्समध्ये गुरुवारी ३ सप्टेंबर पहाटे ४.२० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. चोरीचा संपूर्ण घटनाक्रम दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, डोक्यावर टोपी आणि चेहऱ्यावर कापड बांधलेले तीन चोरटे फुटेजमध्ये दिसून आले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, सचिन सूर्यभान देशमुख ४५ वर्षे रा. फवारा चौक, न्यू शुक्रवारी, नागपूर यांचे बुटीबोरी शहरातील मेन रोडवरील हिवसे कॉम्प्लेक्समध्ये गुरुकृपा ज्वेलर्स हे सराफा दुकान आहे. बुधवारी २ सप्टेंबर रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून ते घरी गेले होते. दरम्यान, गुरुवारी पहाटे चोरट्यांनी दुकानाला लक्ष्य केले. दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि दुकानातील दागिन्यांवर डल्ला मारला. पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी चोरी केल्यानंतर घटनास्थळावरून पोबारा केला.

जिम मालकाच्या फोननंतर उघडकीस -
गुरुकृपा ज्वेलर्सच्या वरच्या मजल्यावर जिम असून, त्याचे मालक मनोज वाघमारे गुरुवारी सकाळी सुमारे ६ वाजता तेथे आले. त्यावेळी दुकानाचे शटर वाकविल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ दुकानमालक सचिन देशमुख यांना फोन करून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच देशमुख यांनी तातडीने दुकान गाठून पाहणी केली. दुकानातील दागिने अस्ताव्यस्त झाल्याचे तसेच काही दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी बुटीबोरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

८४१ ग्रॅम चांदीसह बेन्टेक्सचे दागिने चोरीला -
चोरट्यांनी दुकानातून १ लाख २१ हजार ७९० रुपये किमतीचे ८४१ ग्रॅम वजनाचे चांदीचे ३३ जोड चोरी करून नेले. याशिवाय १२ हजार रुपये किमतीची बेन्टेक्सची १२ मंगळसूत्रे आणि २० हजार रुपये किमतीच्या बेन्टेक्सच्या २० बांगड्या असा एकूण १ लाख ५३ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
 घटनेची माहिती मिळताच बुटीबोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दुकानाची पाहणी करून पंचनामा केला. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता डोक्यावर टोपी आणि चेहऱ्यावर कापड बांधलेले तीन चोरटे शटर वाकवून दुकानात प्रवेश करताना दिसून आले.

अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल -
या प्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू असून, चोरीला गेलेला मुद्देमाल आणि आरोपींचा शोध घेतला जात आहे.

रात्रीची गस्त वाढविली -
बुटीबोरी परिसरात अलीकडच्या काळात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून रात्रीची गस्त वाढविण्यात आली आहे. सध्याच्या तसेच यापूर्वीच्या चोरीच्या घटनांमधील आरोपींचा शोध सुरू असून, त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती बुटीबोरीचे ठाणेदार निशांत मेश्राम यांनी दिली.





  Print






Related Photos