निवृत्तीवेतनधारकांसाठी घरबसल्या जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा

- डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियान ५.० सुरू; चेहरा प्रमाणीकरण तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : शासकीय निवृत्तीवेतनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोयीस्कर व्हावी, यासाठी केंद्र शासनाच्या वतीने १ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियान ५.० राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत चेहरा प्रमाणीकरण (फेस ऑथेंटिकेशन) तंत्रज्ञानाचा वापर करून निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करता येणार आहे. त्यामुळे बँक अथवा कोषागार कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता कमी होणार असून, राज्यातील सर्व शासकीय निवृत्तीवेतनधारकांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी, नागपूर यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या सर्व निवृत्तीवेतनधारकांना दरवर्षी आपले जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. यासाठी शासनाने डिजिटल जीवन प्रमाणपत्राची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. चेहरा प्रमाणीकरण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निवृत्तीवेतनधारकांना आपल्या अँड्रॉइड स्मार्टफोनद्वारे घरबसल्या जीवन प्रमाणपत्र तयार करता येते. या सुविधेमुळे वेळ आणि श्रमांची बचत होण्यासोबतच कार्यालयात जाण्याचा त्रासही कमी होणार आहे.
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांनी आपल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये Aadhaar Face RD App आणि Jeevan Pramaan App हे दोन ॲप डाउनलोड करावेत. त्यानंतर आधार क्रमांक आणि आवश्यक माहिती भरून चेहरा प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी. या प्रक्रियेद्वारे डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करता येते. ही सुविधा सुरक्षित, सुलभ आणि सोयीस्कर असून, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घरबसल्या आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे शक्य झाले आहे.
विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग निवृत्तीवेतनधारक तसेच शारीरिक अडचणींमुळे बँक किंवा कोषागार कार्यालयात जाणे शक्य नसलेल्या निवृत्तीवेतनधारकांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आवश्यकता भासल्यास कुटुंबीय, बँक कर्मचारी किंवा कोषागार कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेऊनही ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
दरम्यान, नागपूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील सर्व शासकीय निवृत्तीवेतनधारकांनी ३० नोव्हेंबर २०२६ पूर्वी डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करून देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियान ५.० मध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा. तसेच चेहरा प्रमाणीकरण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या घरबसल्या प्रमाणपत्र सादर करण्याच्या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी, नागपूर यांनी केले आहे.




Petrol Price




