महत्वाच्या बातम्या

 २१ नोव्हेंबरला चेक बाऊन्स प्रकरणांसाठी विशेष लोक अदालतीचे आयोजन : पक्षकारांना तडजोडीने प्रकरणे निकाली काढण्याची सुवर्णसंधी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : राष्ट्रीय विधी सेवा समिती व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार येत्या २१ नोव्हेंबर रोजी जिल्हा व सत्र न्यायालय, वर्धा तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये चेक बाऊन्स प्रकरणांसंबंधी विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोड पात्र प्रकरणे, परिक्राम्य लेख अधिनियम, १८८१ च्या कलम १३८ अंतर्गत दाखल असलेली धनादेश अनादर (चेक बाऊन्स) तसेच वाद दाखलपूर्व प्रकरणे आपसी सामंजस्यातून तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी हे एक प्रभावी माध्यम ठरत आहे. लोक अदालतीमुळे पक्षकारांचा बहुमूल्य वेळ, आर्थिक खर्च आणि मानसिक त्रास टळतो, तसेच दोन्ही पक्षकारांचे संबंध सलोख्याचे राहतात. या उपक्रमामुळे न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या कमी होण्यास मोठी मदत होत असून, पक्षकार, शासन व समाज या तिन्ही घटकांना याचा मोठा लाभ होतो.

या विशेष लोक अदालतीचा लाभ घेण्यासाठी पक्षकारांनी २१ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हा व सत्र न्यायालय, वर्धा येथे हजर राहावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष हेमंत गायकवाड आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव संजीव सरदार यांनी केले आहे. संबंधित पक्षकारांनी आपल्या प्रकरणाच्या निपटाऱ्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा नजीकच्या दिवाणी व फौजदारी न्यायालय तथा तालुका विधी सेवा समितीशी संपर्क साधावा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने कळविण्यात आले आहे.





  Print






Related Photos