पेन्शनवर न थांबता सेवानिवृत्त तलाठ्याने माळरानावर फुलवली जैविक शेती


- तीन एकर ओसाड जमिनीचे हिरव्या शिवारात रूपांतर; ‘स्वस्थ पीक, समृद्ध भविष्य’ संकल्पनेतून यशस्वी प्रयोग
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर अनेकजण निवांत जीवन जगण्याला प्राधान्य देतात. मात्र, भंडारा शहरातील लिलाधर पराते यांनी या पारंपरिक वाटेला फाटा देत सेवानिवृत्तीनंतरही कष्ट आणि प्रयोगशीलतेची कास धरली आहे. दरमहा सुमारे ४० हजार रुपये पेन्शन मिळत असतानाही त्यावर अवलंबून न राहता त्यांनी वर्षानुवर्षे झुडपी जंगलाने व्यापलेल्या तीन एकर माळरानाचे रूपांतर हिरव्यागार शेतात केले आहे. मोहाडी तालुक्यातील बोंडे खडकी परिसरातील या तीन एकर जमिनीवर पराते यांनी जैविक शेतीचा प्रयोग सुरू केला. स्वस्थ पीक, समृद्ध भविष्य या संकल्पनेतून उभी राहिलेली त्यांची शेती आता परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
झुडपी जंगलातून शेतीचा प्रवास -
सेवानिवृत्तीनंतर काहीतरी वेगळे करण्याचा निर्धार पराते यांनी केला. अनेक वर्षांपासून वापरात नसलेल्या तीन एकर जमिनीवर झुडपी जंगल वाढले होते. जमीन खडकाळ आणि असमतल असल्याने येथे शेती करणे आव्हानात्मक होते. उन्हाळ्याच्या कडक उन्हात मजुरांच्या मदतीने त्यांनी सर्वप्रथम झुडपी जंगलाची साफसफाई केली. त्यानंतर ट्रॅक्टरच्या साहाय्याने धुरे तयार करून जमीन शेतीयोग्य करण्यात आली. सुरुवातीला कठीण वाटणाऱ्या या कामाला सातत्यपूर्ण मेहनतीची जोड मिळाल्याने हळूहळू ओसाड जमिनीचे रूप पालटू लागले आणि माळरानावर हिरवाई फुलू लागली.
कटिंग नंतर पुन्हा जोमदार फुटवे -
उन्हाळ्याच्या अखेरीस उत्पादनात घट झाल्यानंतर पिकांची कटिंग करण्यात आली. त्यानंतर शेणखत आणि जैविक औषधांची फवारणी करण्यात आली. यामुळे खोडव्याला मोठ्या प्रमाणात नवीन फुटवे फुटले. पावसाळा सुरू होताच या फुटव्यांची जोमदार वाढ झाली आणि पुन्हा उत्पादन सुरू झाले. त्यामुळे एकाच पिकातून सातत्याने उत्पादन मिळविण्याच्या दृष्टीनेही हा प्रयोग फायदेशीर ठरला आहे.
शेतातच तयार होतात जैविक निविष्ठा -
रासायनिक शेतीमुळे होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन पराते यांनी सुरुवातीपासूनच जैविक शेतीचा मार्ग स्वीकारला. बाहेरून महागड्या निविष्ठा खरेदी करण्याऐवजी उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून ते शेतातच जीवामृत आणि दशपर्णी अर्क तयार करतात. जंगल परिसरात उपलब्ध वनस्पतींचा उपयोग करून तयार करण्यात येणाऱ्या या जैविक निविष्ठांमुळे शेतीचा खर्च कमी होण्यास मदत झाली आहे. त्याचबरोबर जमिनीची सुपीकता आणि पिकांचा दर्जा टिकवून ठेवण्यावरही भर दिला जात आहे.
ठिबक सिंचन, मल्चिंगचा प्रभावी वापर -
पाण्याची बचत आणि उत्पादनात सातत्य राहावे यासाठी शेतात ठिबक सिंचन आणि मल्चिंग तंत्राचा प्रभावी वापर केला जात आहे. कमी पाण्यात पिकांना आवश्यक ओलावा उपलब्ध करून देण्यास ठिबक सिंचनाची मदत होत आहे, तर मल्चिंगमुळे जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते. या पद्धतीने भेंडी, कारले, वांगी यांसारख्या भाजीपाला पिकांची लागवड करून दर्जेदार जैविक उत्पादन घेतले जात आहे.
नागपूरच्या बाजारपेठेत जैविक भाजीपाला -
पराते यांच्या शेतात उत्पादित होणाऱ्या जैविक भाजीपाल्याची नागपूर येथे विक्री केली जाते. जैविक पद्धतीने उत्पादित मालाला चांगला भाव मिळत असल्याने मजुरीचा खर्च वजा केल्यानंतरही शेती परवडणारी ठरत असल्याचे ते सांगतात. या शेतीमुळे परिसरातील विशेषतः महिला मजुरांना नियमित रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे पराते यांच्या शेतीचा फायदा केवळ त्यांच्या कुटुंबापुरता मर्यादित न राहता स्थानिक मजुरांनाही होत आहे.
इतर शेतकऱ्यांनीही घेतली प्रेरणा -
पराते यांच्या जैविक शेतीच्या प्रयोगाने इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे. त्यांच्या प्रयोगातून प्रेरणा घेऊन कोका येथील विजय हातझाडे यांनीही जैविक पद्धतीने चवळी, दोडके आणि काकडीचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. माळरानावर झुडपी जंगल उगवलेल्या जमिनीला मेहनत, नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास उत्पादनक्षम शेतात रूपांतर करता येते, हे पराते यांच्या प्रयोगातून दिसून येते.
सेवानिवृत्तीनंतर नवा आदर्श -
सेवानिवृत्तीनंतर दरमहा सुमारे ४० हजार रुपयांचे पेन्शन मिळत असतानाही केवळ त्यावर अवलंबून न राहता पराते यांनी शेतीची वाट निवडली. कष्ट, प्रयोगशीलता आणि निसर्गपूरक शेतीच्या माध्यमातून सेवानिवृत्तीनंतरही आर्थिकदृष्ट्या सक्षम होता येते, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. ओसाड माळरानाचे हिरव्या शिवारात रूपांतर करून उभी केलेली ही जैविक शेती केवळ शेतीचा प्रयोग नसून, इच्छाशक्ती आणि मेहनत असेल तर कोणतीही जमीन फुलवता येते, याचा प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.




Petrol Price




