महत्वाच्या बातम्या

 ७ नोव्हेंबरला जिल्हाभर कचरा कमी करा अभियान


- सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष स्वच्छता व जनजागृती मोहीम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार १ ते ७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ब्रिक्स सस्टेनेबल लाइफस्टाइल वीक साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत मिशन लाईफ अभियानाच्या माध्यमातून ७ नोव्हेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये कचरा कमी करा ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत सर्व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी केले आहे.

पर्यावरणपूरक व शाश्वत जीवनशैलीचा अंगीकार करण्यास नागरिकांना प्रोत्साहित करणे, कचऱ्याची निर्मिती कमी करणे तसेच कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया याबाबत व्यापक जनजागृती करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. विशेषतः ग्रामीण भागात लोकसहभागातून स्वच्छतेची चळवळ अधिक बळकट करण्यावर भर देण्यात येणार आहे.

७ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी विशेष स्वच्छता व जनजागृती मोहिमांचे आयोजन करावे. यामध्ये ग्रामस्थ, महिला बचत गट, युवक मंडळे, शाळा, स्वयंसेवी संस्था व स्थानिक लोकप्रतिनिधींचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करावा. घराघरांतून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे ओला, सुका व घातक कचरा असे स्रोत स्तरावरच वर्गीकरण करण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करावे. ओल्या कचऱ्यामध्ये भाजीपाल्याचे अवशेष, उरलेले अन्न व पालापाचोळा, तर सुक्या कचऱ्यामध्ये कागद, प्लास्टिक, धातू व काच यांचा समावेश होतो. बॅटरी, इलेक्ट्रॉनिक वस्तू व मुदतबाह्य औषधे यांसारख्या घातक कचऱ्याची स्वतंत्रपणे सुरक्षित विल्हेवाट लावण्याबाबत जनजागृती करण्यात यावी.

कचरा कमी करणे व पुनर्वापराला प्राधान्य -
कचरा व्यवस्थापनामध्ये सर्वप्रथम कचरा निर्माण होऊ न देणे, त्यानंतर कचऱ्याचे प्रमाण कमी करणे, वस्तूंचा पुनर्वापर करणे, पुनर्प्रक्रिया करणे आणि शेवटी उर्वरित कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे या क्रमाला प्राधान्य देण्यात येणार आहे. घरगुती व सामुदायिक स्तरावर कंपोस्ट खड्डे किंवा कंपोस्ट बिनच्या माध्यमातून ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती करण्यास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. तसेच एकल वापर प्लास्टिक टाळणे, कापडी पिशव्यांचा वापर करणे, पुन्हा भरता येणाऱ्या बाटल्या वापरणे आणि जुन्या वस्तूंची दुरुस्ती करून त्यांचा पुनर्वापर करण्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यात येणार आहे.

वेस्ट टू वंडर व वेस्ट टू आर्ट यांसारख्या नावीन्यपूर्ण उपक्रमांनाही चालना देण्यात येणार आहे. याशिवाय रिड्यूस, रियूज, रिसायकल केंद्रांच्या माध्यमातून वापरण्यायोग्य जुने कपडे, पुस्तके, खेळणी व इतर वस्तू संकलित करून त्या पुन्हा उपयोगात आणण्यावर भर देण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत ग्रामपंचायतींनी राबविलेल्या विविध उपक्रमांचे सविस्तर वृत्त, छायाचित्रे व व्हिडिओ केंद्र शासनाच्या Meri Panchayat ॲपवर तात्काळ अपलोड करावेत. तसेच जिल्हा परिषद, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवर MissionLiFE, Proplanetpeople आणि BRICSforLIFE या हॅशटॅगसह उपक्रमांना प्रसिद्धी द्यावी.

लोकसहभागातून कचरामुक्त जिल्हा निर्मितीचा संकल्प -
स्वच्छता ही केवळ शासकीय यंत्रणेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे सामूहिक कर्तव्य आहे. दैनंदिन जीवनातील छोट्या-छोट्या सवयींमध्ये बदल करून कचऱ्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी करता येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने कचऱ्याचे स्रोत स्तरावर वर्गीकरण करावे, एकल वापर प्लास्टिक टाळावे आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करावा.  मिशन लाईफ  अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप देऊन चंद्रपूर जिल्हा स्वच्छ, सुंदर, कचरामुक्त व पर्यावरणपूरक बनविण्यासाठी सर्वांनी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी केले आहे.





  Print






Related Photos