महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूर भूमी अभिलेख कार्यालयाचा कारभार प्रभारींच्या भरवशावर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर शहरातील भूमी अभिलेख कार्यालयाचा कारभार सध्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरू असून, कायमस्वरूपी अधिकारी उपलब्ध नसल्याने नागरिकांची महत्त्वाची कामे खोळंबत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. विविध कामांसाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. बल्लारपूर भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक अनिल देशमुख यांची २० जून रोजी बदली झाली. त्यानंतर सोनवणे यांच्याकडे बल्लारपूरच्या उपअधीक्षकपदाचा प्रभार सोपविण्यात आला. मात्र, सोनवणे यांची मुख्य जबाबदारी राजुरा येथे असल्याने बल्लारपूर कार्यालयातील कामकाजाकडे अपेक्षित लक्ष देता येत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

भूमी अभिलेख कार्यालयात जमीन मोजणी, नकाशे, अभिलेखातील नोंदी, फेरफार यासह नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाची कामे केली जातात. या कामांसाठी दूरवरून नागरिक कार्यालयात येतात. मात्र, अधिकारी उपलब्ध नसल्यास संबंधित कामासाठी पुन्हा कार्यालयात येण्याची वेळ नागरिकांवर येत असल्याचे सांगितले जात आहे. विशेषतः शेतकरी आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एका कामासाठी अनेकदा कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याने नागरिकांचा वेळ आणि पैसा खर्च होत आहे.

सोनवणे यांच्याकडे राजुरा येथील जबाबदारी असताना बल्लारपूर भूमी अभिलेख कार्यालयाचा कारभारही सोपविण्यात आला आहे. त्यामुळे दोन ठिकाणच्या जबाबदाऱ्या सांभाळताना बल्लारपूर कार्यालयातील नागरिकांची कामे वेळेत मार्गी लागत आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रभारी व्यवस्था ही तात्पुरती उपाययोजना असते. मात्र, दीर्घकाळ कायमस्वरूपी अधिकारी उपलब्ध न झाल्यास त्याचा परिणाम कार्यालयीन कामकाजावर तसेच नागरिकांच्या कामांवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बल्लारपूर कार्यालयासाठी पूर्णवेळ उपअधीक्षकाची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

भूमी अभिलेख कार्यालयातील प्रलंबित कामे, अधिकारी उपस्थिती आणि नागरिकांना येणाऱ्या अडचणी यांची वरिष्ठ पातळीवरून पाहणी करावी, अशी मागणी होत आहे. जिल्हा प्रशासनाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन कार्यालयाचा कारभार सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. नागरिकांना आपल्या कामासाठी वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची वेळ येऊ नये, यासाठी कायमस्वरूपी अधिकारी नियुक्त करून नागरिकांची कामे वेळेत मार्गी लावावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.





  Print






Related Photos