महत्वाच्या बातम्या

 विषमुक्त शेतीचा पॅटर्न : वर्ध्यात ८ हजारांवर शेतकरी नैसर्गिक शेतीकडे


- ६८ शेतीगटांच्या माध्यमातून ३ हजार ७७५ हेक्टरवर प्रयोग; उत्पादित मालासाठी हक्काची बाजारपेठ उभारण्याची गरज

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत आणि सुपीकता धोक्यात येत असताना वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता नैसर्गिक शेतीची कास धरली आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत जिल्ह्यातील तब्बल ८ हजार १२५ शेतकऱ्यांनी ३ हजार ७७५ हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक शेतीचा प्रयोग सुरू केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात विषमुक्त आणि शाश्वत शेतीचा नवा पॅटर्न आकाराला
येत आहे.

सन २०२५-२६ मध्ये ६ हजार ७५०, तर सन २०२६-२७ मध्ये १ हजार ३७४ शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा स्वीकार केला आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या अभियानाला शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद मिळत असून, पारंपरिक रासायनिक शेतीला पर्याय म्हणून नैसर्गिक शेतीकडे पाहिले जात आहे.

६८ शेतीगटांची भक्कम साखळी -
जिल्ह्यात नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी एकूण ६८ शेतीगटांची स्थापना करण्यात आली आहे. या गटांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकत्र आणून नैसर्गिक शेतीच्या पद्धती, निविष्ठा तयार करण्याचे तंत्र, पीक व्यवस्थापन आणि उत्पादनाचे नियोजन याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.एकाच परिसरातील अनेक शेतकरी नैसर्गिक शेतीकडे वळल्याने मोठ्या क्षेत्रावर विषमुक्त शेतीचे क्लस्टर तयार होण्यास मदत होत आहे. त्यामुळे वैयक्तिक पातळीवरील प्रयोगाचे रूपांतर आता सामूहिक शेती उपक्रमात होत आहे.

सोयाबीन, तूर, हरभऱ्यासह भाजीपाल्याची लागवड -
सोयाबीन, तूर, हरभऱ्यांतून समृद्धी’ या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांनी नैसर्गिक पद्धतीने विविध पिकांची लागवड केली आहे. सोयाबीन, तूर आणि हरभरा या प्रमुख पिकांसोबतच विविध प्रकारच्या भाजीपाल्याचीही लागवड केली जात आहे.विशेष म्हणजे नैसर्गिक शेतीकडे वळलेले शेतकरी हा केवळ प्रायोगिक उपक्रम न ठेवता त्याकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहत आहेत. रासायनिक निविष्ठांवरील खर्च कमी करून स्थानिक पातळीवर उपलब्ध नैसर्गिक निविष्ठांचा वापर करण्यावर भर दिला जात आहे.

शाश्वत शेतीकडे पाऊल -
रासायनिक खतांचा वाढता वापर, उत्पादन खर्चातील वाढ आणि जमिनीच्या आरोग्यावर होणारा परिणाम या पार्श्वभूमीवर नैसर्गिक शेती हा शाश्वत शेतीचा पर्याय ठरू शकतो. नैसर्गिक पद्धतीने शेती केल्याने जमिनीतील सेंद्रिय घटक टिकविण्यास तसेच जमिनीची सुपीकता सुधारण्यास मदत होऊ शकते. वर्धा जिल्ह्यातील ८ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा स्वीकार केल्याने आगामी काळात हा प्रयोग जिल्ह्यातील अन्य शेतकऱ्यांसाठीही प्रेरणादायी ठरण्याची शक्यता आहे.

तालुकानिहाय नैसर्गिक शेतीचे क्षेत्र व शेतकरी
तालुका क्षेत्र (हेक्टर) शेतकरी
आष्टी - ३०० ७५०
वर्धा - ३०० ७५०
हिंगणघाट -३०० ७५०
समुद्रपूर - ४५० १,१२५
कारंजा - ६२५ ९००
आर्वी - ३०० ७५०
सेलू - ३०० ७५०
देवळी -३००  ७५०

उत्पादन वाढले आता बाजारपेठेची गरज -
नैसर्गिक शेतीचा विस्तार होत असताना या शेतीतून उत्पादित होणाऱ्या मालाला योग्य बाजारपेठ आणि अपेक्षित दर मिळणे हे पुढील मोठे आव्हान ठरणार आहे. नैसर्गिक पद्धतीने उत्पादित मालाची स्वतंत्र ओळख निर्माण करून त्याचे ब्रँडिंग, पॅकिंग आणि थेट विक्रीची व्यवस्था उभी केल्यास शेतकऱ्यांना अधिक आर्थिक फायदा मिळू शकतो.

शेतीगटांच्या माध्यमातून सामूहिक पद्धतीने मालाची विक्री केल्यास वाहतूक, साठवणूक आणि विपणन खर्च कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे नैसर्गिक शेतीचा विस्तार करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यात स्वतंत्र आणि सक्षम बाजारपेठ उभारण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

क्लस्टर निवडीचे निकष -
नैसर्गिक शेतीसाठी क्लस्टरची निवड करताना प्रमुख नदीकाठचे क्षेत्र, रासायनिक खतांचा जास्त किंवा कमी वापर असलेले भाग, आदिवासीबहुल तालुके तसेच एसएलआरएम, पीएसीएस, एफपीओ आणि सीबीओ यांची उपलब्धता आदी निकषांचा विचार केला जात आहे. या माध्यमातून नैसर्गिक शेतीचा विस्तार नियोजनबद्ध पद्धतीने करण्याचा प्रयत्न कृषी विभागाकडून केला जात आहे.

जिल्हावासीयांना मिळतेय विषमुक्त अन्न -
नैसर्गिक शेतीच्या वाढत्या क्षेत्राचा फायदा केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे, तर जिल्ह्यातील नागरिकांनाही होत आहे. नैसर्गिक पद्धतीने उत्पादित केलेला ताजा भाजीपाला आणि इतर कृषी उत्पादने ग्राहकांना उपलब्ध होऊ लागली आहेत. आरोग्याबाबत वाढलेल्या जागरूकतेमुळे अशा उत्पादनांना ग्राहकांकडूनही चांगली मागणी मिळत आहे.

दुसरीकडे, रासायनिक खते आणि कीटकनाशकांवरील खर्च कमी करण्यासाठी शेतकरी नैसर्गिक निविष्ठांचा वापर करू लागले आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चात बचत करण्याबरोबरच जमिनीची सुपीकता आणि सेंद्रिय घटक टिकवून ठेवण्यास मदत होत आहे. नैसर्गिक शेतीचे क्षेत्र वाढत असताना त्याला बाजारपेठेची मजबूत जोड मिळाली, तर वर्धा जिल्ह्यातील हा विषमुक्त शेतीचा प्रयोग शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीबरोबरच आरोग्यदायी अन्नव्यवस्थेचा पथदर्शी नमुना ठरू शकतो.





  Print






Related Photos