शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर आढळला बिनविषारी साप : सर्पमित्रांनी सुरक्षितपणे पकडून केला निसर्गमुक्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भद्रावती : चिंचोर्डी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ १४ ऑगस्ट २०२६ रोजी बिनविषारी दिवड (धोंड्या) साप आढळून आल्याने विद्यार्थी व शिक्षकांची काही काळ धावपळ उडाली. विद्यार्थ्यांची नियमित ये-जा असलेल्या मुख्य गेटजवळच साप आढळल्याने शाळा प्रशासनाने तातडीने सर्पमित्रांना पाचारण केले.
शाळेचे मुख्याध्यापक रमणे यांनी घटनेची माहिती मिळताच सर्पमित्रांशी संपर्क साधला.
त्यानंतर सार्ड संस्थेचे अनुप येरणे, आशिष चायकाटे, स्नेहल शेंडे यांच्यासह सर्पमित्रांची टीम काही वेळातच शाळेत दाखल झाली. त्यांनी परिस्थितीचा काळजीपूर्वक आढावा घेत अत्यंत कौशल्याने सापाला सुरक्षितपणे पकडले. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि शाळा प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला. पकडण्यात आलेला साप बिनविषारी असून स्थानिक पातळीवर त्याला दिवड (धोंड्या) या नावाने ओळखले जाते, अशी माहिती सर्पमित्रांनी दिली. सापाला कोणतीही इजा न करता त्याला सुरक्षित ठिकाणी निसर्गमुक्त करण्यात आले.
दरम्यान, सर्पमित्रांनी विद्यार्थ्यांना विषारी व बिनविषारी सापांची ओळख, साप आढळल्यास घ्यावयाची काळजी तसेच शाळा व परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत मार्गदर्शन केले. सर्पमित्रांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे संभाव्य धोका टळला असून, त्यांच्या कार्याचे शाळा प्रशासनाने कौतुक केले.




Petrol Price




