ब्रम्हपुरी क्षेत्रातुन अधिकाधिक प्रशासकीय अधिकारी घडले पाहिजे : आ. विजय वडेट्टीवार
- दीड हजार विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वितरण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : ब्रम्हपुरीला विदयानगरी म्हणून संबोधले जाते. या विदयानगरीत जास्तीत शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करीत असतो. आपण सर्व विद्यार्थ्यांनी ब्रम्हपुरीचे नाव मोठे कराव हीच माझी इच्छा असुन माझ्या ब्रम्हपुरी विधानसभात मोठ्या प्रमाणात प्रशासकीय अधिकारी घडले पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.
ते ब्रम्हपुरी शहरातील ने. ही. सभागृहात आ. विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने व आधार फाउंडेशनच्या वतीने आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून डॉ.विनोद आसुवानी हे होते.
यावेळी कार्यक्रमाला नेवजाबाई हीतकारीणी शिक्षण संस्थेचे सचिव अशोक भैय्या, माजी जि.प. सदस्य प्रमोद चिमुरकर, माजी जि.प. सदस्या स्मिताताई पारधी, माजी पं.स. सदस्य थानेश्वर कायरकर, नगरसेवक डॉ. नितीन उराडे, नगरसेवक हितेंद्र राऊत, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगलाताई लोनबले, महीला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिताताई आमले, ने.ही. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गहाणे, ने.ही. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ शेकोकर, विनोद नरड यांची यावेळी उपस्थिती होती.
पुढे बोलतांना आ. वडेट्टीवार म्हणाले की, ब्रम्हपुरी शहरात २२ हजार फुटांची क्षेत्रफळ इतकी मोठी ई-लायब्ररी निर्माणाधीन असुन लवकरच सदर लायब्ररी सुरू होणार आहे. समस्या सर्वांना येत असतात त्यामुळे निराश न होता समस्येला तोंड देऊन जीवनात यशस्वी होता येते. माझ्या सुध्दा आयुष्यात अनेक संकटे आली परंतु मी कधीच हार न मानता लढत राहीलो त्यामुळे मी गेल्या २६ वर्षांपासून आमदार म्हणून सतत निवडुन येत आहे. चेहऱ्याच्या सुंदरतेपेक्षा विचारांची सुंदरता फार महत्वाची आहे. कारण चेहऱ्याची सुंदरता वयोमानानुसार बदलत जाते. मात्र सुंदर विचार हे आयुष्यात नेहमीच श्रेष्ठ ठरत असतात. धन चोरता येते पण ज्ञान चोरता येत नाही. जिथं दुख आहे, वेदना आहेत. तिथं विजय वडेट्टीवार सदैव आपल्या पाठीशी आहे. माणसाच्या सेवेत खरा देव आणि धर्म असुन माणसाच्या सेवेमध्ये खरे पुण्य लाभत असते. विद्यार्थ्यांनो आयुष्यात संकटे आली तर रडत न बसता लढत राहा आणि ब्रम्हपुरीचे नाव फार मोठे करा असेही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले. यांनतर ब्रम्हपुरी, नागभीड तालुका व परिसरातील दीड हजार विद्यार्थ्यांना जेईई, नीट, एमएचसीईटी, या महत्त्वपूर्ण व भविष्य घडविणाऱ्या स्पर्धा परीक्षाची पुस्तके विनामूल्य वितरित करण्यात आली.
तर कार्यक्रमाचे अतिथी ने. ही. शिक्षण संस्थेचे सचिव अशोक भैय्या यांनी बोलताना सांगितले की, विद्यार्थ्यांना कोणत्याही शैक्षणिक अडचणी आल्या तर त्या दुर करण्यासाठी सदैव कटिबध्द असुन ब्रम्हपुरीतील विद्यार्थ्यांनी सुध्दा मोठे स्वप्न बघून ते पुर्णत्वास आणावे हीच आमची इच्छा असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकेश चौबे प्रास्तविक दिनेश मलिये तर आभार मुकेश चौबे मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आधार फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.
News - Chandrapur