राज्यातील ७५ टक्के साखर कारखान्यांची धुराडी बंद : गाळप हंगाम कधी संपणार?
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / पुणे : राज्यातील गाळप हंगाम शेवटच्या टप्प्यात असून राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी आपले गाळप थांबवले आहे. तर राज्यातील २५ टक्के साखर कारखाने अद्यापही सुरूच आहेत. यंदा उसाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता होती पण अवकाळी पावसाचा फायदा उसाला झाला आणि उसाबरोबर साखरेचे उत्पादनही वाढले आहे.
दरम्यान, १ एप्रिल पर्यंतच्या उस गाळपाच्या अहवालानुसार राज्यात १ हजार ५० लाख मेट्रीक टन उसाचे गाळप झाले असून १ हजार ७४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. दरम्यान मागच्या वर्षी याच वेळेस १ हजार ५२ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप झाले होते तर १ हजार ५० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. तर यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेत जास्त साखर उत्पादन झाले आहे.
सरकारच्या निर्बंधानंतर इथेनॉल उत्पादन घटले! तरीही एवढे झाले उत्पादन -
यंदा राज्यात एकूण २०७ साखर कारखान्यांनी गाळप केले असून सध्या त्यातील ७५ टक्के म्हणजेच १५१ साखर कारखान्यांनी आपले गाळप थांबवले असून ५६ साखर कारखान्यांचे गाळप सुरू आहे. मागच्या वर्षी २११ साखर कारखान्यांनी गाळप केले होते तर या वेळेस २०० साखर कारखान्यांनी गाळप थांबवले होते. यंदा अपेक्षेपेक्षा जास्त उसाचे गाळप झाल्याचे चित्र आहे.
दरम्यान, ज्या भागांतील ऊसांचे फड संपले आहेत आणि पाण्याची टंचाई आहे अशा साखर कारखान्यांनी आपले गाळप थांबवले आहे. तर ज्या भागांत ऊस शिल्लक आहे अशा भागांतील साखर कारखान्यांचे गाळप सुरू आहे. येणाऱ्या १५ दिवसांत या साखर कारखान्यांचे गाळप संपेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे साखर कारखाने १५ ते २० एप्रिलपर्यंत चालण्याची शक्यता आहे.
News - Rajy