आजपासून खो-खो ने दुमदुमणार चिटणीस पार्क


- कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेस प्रारंभ
- 15 ते 19 फेब्रुवारीपर्यंत क्रीडाप्रेमीस पर्वणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : क्रीडा विभागामार्फत कुस्ती, खो-खो, कबड्डी व व्हॉलिबॉल या चार क्रीडा प्रकाराच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यंदाची कै.भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचा प्रारंभ 15 फेब्रुवारीला सायंकाळी 7 वाजता होणार असून समर्थ स्टेडियम, चिटणीस पार्क 15 ते 19 फेब्रुवारीदरम्यान खो-खो ने दुमदुमणार आहे.
जिल्हा प्रशासनासह महानगरपालिका व विदर्भ खो-खो संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकड्डे, सर्व विधान परिषद व विधानसभा सदस्य उपस्थित राहणार आहेत. राज्यातील नामवंत खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार असून नागपुरच्या क्रीडा प्रेमींनी मोठ्या संख्येने प्रारंभ होणाऱ्या या स्पर्धेला बघण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय चषक खो-खो स्पर्धा, कॅापीमुक्त परीक्षा, जी-२० छायाचित्र स्पर्धा आणि जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्ष या संदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, पोलिस उपअधीक्षक संजय पुरंदरे, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, विदर्भ खो-खो असोसिएशनचे सचिव सुधीर निंबाळकर, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, मनपाचे क्रीडा अधिकारी डॉ. पियुश आंबुलकर यावेळी उपस्थित होते.
News - Nagpur