महत्वाच्या बातम्या

 दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात : उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या २४ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात त्याच्यासोबत असलेला मित्रही जखमी झाला. ही घटना वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. मृत तरुणाचे नाव शेरसिंग दीपसिंग उईके २४, रा. लावा, वाडी असे आहे. तो मूळचा कटंगी, बालाघाट (मध्य प्रदेश) येथील रहिवासी असून रोजगाराच्या निमित्ताने नागपुरात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर रोजी शेरसिंग हा त्याचा मित्र सुखराम मडावी याच्यासोबत एमपी-२२-झेडएच-७५०३ क्रमांकाच्या दुचाकीवरून जात होता. दोघेही सोनबानगरकडून खडगावच्या दिशेने जात असताना विदर्भ लॉजिस्टिकसमोर दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकीचा अपघात झाला.

या अपघातात शेरसिंग आणि सुखराम दोघेही गंभीर जखमी झाले. शेरसिंग याच्यावर उपचार सुरू असताना त्याची प्रकृती खालावली आणि अखेर त्याचा मृत्यू झाला. सुखराम मडावी याच्यावरही उपचार सुरू असल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच वाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची नोंद करून पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.





  Print






Related Photos