महत्वाच्या बातम्या

 सिंदेवाहीत घरातच अवैध दारूभट्टीचा अड्डा : १२ ड्रम मोहफुल सडवा जप्त, लाखाचा मुद्देमाल नष्ट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : घराच्या चार भिंतीआड अवैध मोहफुल दारू निर्मितीचा व्यवसाय सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सिंदेवाही पोलिसांनी जाटलापूर मार्गावरील एका कच्च्या घरावर छापा टाकून मोहफुल दारू निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत मोहफुलांचा सडवा भरलेले १२ ड्रम, दारू तयार करण्याचे साहित्य आणि तयार मोहफुल दारू असा एकूण १ लाख ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून घटनास्थळीच नष्ट करण्यात आला.

निखिल बांबोळे रा. आंबेडकर चौक, सिंदेवाही हा जाटलापूर मार्गावरील स्वतःच्या मालकीच्या कच्च्या घरात मोहफुलांपासून दारू तयार करून विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे २१ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास पोलीस पथकाने  संबंधित घरावर छापा टाकला. यावेळी घरातील दोन स्वतंत्र खोल्यांमध्ये मोहफुलांचा सडवा भरलेले १२ ड्रम आढळून आले. तसेच दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे विविध साहित्य आणि तयार मोहफुल दारूही पोलिसांनी जप्त केली.

पंचांसमक्ष हा सर्व मुद्देमाल जागेवरच नष्ट करण्यात आला. याप्रकरणी निखिल बांबोळे याच्याविरुद्ध सिंदेवाही पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६४६/२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई), (फ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लता वाडीवे यांचा नेतृत्वात पोहवा सुधीर पराते, मपोहवा श्वेता, नापोअं चिमाजी देवकते, नारायण येगेवार, पोअं जाफर, शुभम, चापोअं ब्रिजेश निर्मल आणि चंचल यांनी केले.





  Print






Related Photos