आरमोरीच्या यात्रेतून दुचाकी लंपास


- देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाला फटका; डॉ. आंबेडकर शाळेजवळील घटना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : आरमोरी येथील देवीच्या यात्रेत दर्शनासाठी आलेल्या एका तरुणाची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना १७ ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली. डॉ. आंबेडकर शाळेजवळ उभी केलेली दुचाकी गायब झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित तरुणाने शोध घेतला; मात्र दुचाकी मिळून आली नाही. या प्रकरणी आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कोमल इतवारी कोराम (रा. सुरसुंडी, ता. धानोरा) हा तरुण आपल्या मित्रासोबत आरमोरी येथील यात्रेत सहभागी होण्यासाठी आला होता. यात्रेच्या ठिकाणी जाण्यापूर्वी त्याने आपली दुचाकी (क्रमांक एमएच ३३ झेड-२५८५) डॉ. आंबेडकर शाळेजवळ उभी केली. त्यानंतर दोघेही देवीच्या दर्शनासाठी आणि यात्रेत फिरण्यासाठी गेले.
रात्री साडेअकराच्या सुमारास यात्रेतून परत आल्यानंतर कोमल कोराम याला त्याने उभी केलेली दुचाकी त्या ठिकाणी दिसून आली नाही. त्याने परिसरात दुचाकीचा शोध घेतला; मात्र ती कुठेही आढळली नाही. अखेर अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याचे लक्षात आल्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
दुचाकी स्वतःच्या नावावर करण्यापूर्वीच चोरी -
चोरी झालेल्या दुचाकीची किंमत सुमारे ३० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. कोमल कोराम याने ही दुचाकी खरेदी केली होती; मात्र ती स्वतःच्या नावावर करण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नव्हती. दुचाकी नावावर होण्यापूर्वीच चोरीला गेल्याने त्याला आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.
या घटनेप्रकरणी आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार नीळकंठ कोकोडे करीत आहेत. यात्रेच्या काळात गर्दीचा फायदा घेऊन वाहन चोरीच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता भाविकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी उभी करून योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.




Petrol Price




