महत्वाच्या बातम्या

 रानटी हत्तींचा कळप पुन्हा पोर्ला वनपरिक्षेत्रात : शेतकऱ्यांमध्ये भीती


- चार दिवसांपूर्वी वैनगंगा ओलांडून चंद्रपूर जिल्ह्यात गेलेला कळप पुन्हा परतला; धानपिकांचे मोठे नुकसान

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : अवघ्या चार दिवसांपूर्वी पोर्ला वनपरिक्षेत्रातून वैनगंगा नदी ओलांडून चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झालेला रानटी हत्तींचा कळप शुक्रवारी मध्यरात्री पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात परतला आहे. काटली परिसरातून हत्तींच्या कळपाने पुन्हा पोर्ला वनपरिक्षेत्रात प्रवेश केल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रानटी हत्तींचा कळप पुन्हा पोर्ला वनपरिक्षेत्रात दाखल झाल्याची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, हत्तींचा कळप आता कोणत्या दिशेने मार्गक्रमण करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

चंद्रपूर जिल्ह्यात धानपिकांची तुडवड -
पोर्ला वनपरिक्षेत्रातून वैनगंगा नदी ओलांडून चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात दाखल झाल्यानंतर या हत्तींच्या कळपाने शेतांमध्ये धुडगूस घातला. हत्तींच्या कळपाने उभ्या धान पिकांमध्ये प्रवेश करून मोठ्या प्रमाणात पिकांची तुडवड आणि नासधूस केली. ऐन पीक काढणीच्या काळात उभ्या धान पिकांचे नुकसान झाल्याने संबंधित शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. मेहनतीने उभे केलेले पीक हत्तींच्या कळपामुळे काही वेळातच उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आणि चिंता व्यक्त होत आहे.

पुन्हा पोर्ला वनपरिक्षेत्रात ठिय्या -
चंद्रपूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागात नुकसान केल्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री हत्तींचा कळप काटली परिसरातून पुन्हा पोर्ला वनपरिक्षेत्रात दाखल झाला. त्यामुळे आता पोर्ला परिसरातील शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. हत्तींचा कळप वनपरिक्षेत्रातच ठिय्या मांडून असल्याने आसपासच्या गावांतील शेतकऱ्यांना सतर्क राहावे लागत आहे. हत्ती शेतजमिनीच्या दिशेने आल्यास पुन्हा धान पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.

वनविभागाच्या हालचालींकडे लक्ष -
रानटी हत्तींच्या कळपाच्या सतत बदलणाऱ्या हालचालींमुळे वनविभागासमोरही आव्हान निर्माण झाले आहे. हत्तींच्या कळपाचा मागोवा घेऊन त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे तसेच शेतकरी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. हत्तींच्या कळपाची पुढील दिशा कोणती असेल, तो पुन्हा वैनगंगा नदीच्या दिशेने मार्गक्रमण करणार की पोर्ला वनपरिक्षेत्रातीलच भागात राहणार, याबाबत सध्या परिसरात उत्सुकता आणि चिंता आहे.

दरम्यान, हत्तींच्या उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व नागरिकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक असून, हत्तींच्या जवळ जाणे किंवा त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न टाळणे गरजेचे आहे. रानटी हत्तींच्या कळपाच्या पुनरागमनामुळे पोर्ला वनपरिक्षेत्रातील शेतकरी सध्या दहशतीच्या छायेत असून, हत्तींच्या पुढील हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





  Print






Related Photos