महत्वाच्या बातम्या

 भंडाऱ्यात १६ नोव्हेंबरला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन


- सकाळी ११ वाजता उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) यांच्या अध्यक्षतेखाली होणार आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : महिलांच्या तक्रारी, समस्या आणि अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ वाजता उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली हा महिला लोकशाही दिन पार पडणार आहे.

शासनाच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना आपल्या वैयक्तिक स्वरूपाच्या तक्रारी, निवेदने आणि समस्या प्रशासनासमोर मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. संबंधित तक्रारींची दखल घेऊन त्यावर आवश्यक कार्यवाही करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जातो.

महिला लोकशाही दिनासाठी तक्रार अर्ज विहित नमुन्यात सादर करणे आवश्यक असून, अर्जाच्या दोन प्रती सादर कराव्यात. तसेच तक्रार किंवा निवेदन हे वैयक्तिक स्वरूपाचे असणे बंधनकारक आहे. अर्जासोबत तक्रारीशी संबंधित आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रती जोडणे आवश्यक आहे.

दरम्यान, न्यायप्रविष्ट प्रकरणे, विहित नमुन्यात नसलेले अर्ज, आवश्यक कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज तसेच सेवा विषयक व आस्थापना विषयक बाबींसंदर्भातील तक्रारी महिला लोकशाही दिनासाठी स्वीकारल्या जाणार नाहीत. त्याचप्रमाणे वैयक्तिक स्वरूप नसलेली सामूहिक तक्रार किंवा निवेदनेही स्वीकारण्यात येणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

त्यामुळे तक्रार मांडू इच्छिणाऱ्या महिलांनी विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह अर्जाच्या दोन प्रती सादर करून महिला लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





  Print






Related Photos