बल्लारपूरात ११ गोवंश जनावरांची सुटका : १३.४० लाखांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी अटकेत तर तीन फरार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : गोवंश जनावरांना निर्दयतेने वाहनात कोंबून कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक केली जात असल्याचा प्रकार बल्लारपूर पोलिसांनी उघडकीस आणला. चंद्रपूर-बल्लारपूर महामार्गावरील विसापूर टोलनाक्यासमोरील चुनाभट्टी परिसरात पोलिसांनी नाकाबंदी करून कर्नाटक राज्यातील आयशर वाहन पकडले. या वाहनात दाटीवाटीने कोंबून ठेवलेल्या ११ गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली. मात्र, यातील एका गायीचा मृत्यू झाला. या कारवाईत वाहन, गोवंश जनावरे आणि मोबाईल असा एकूण १३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे, तर तीन आरोपी फरार आहेत.
ही कारवाई २५ ऑक्टोबर रोजी बल्लारपूर पोलिसांनी केली. पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड हे पोलीस पथकासह परिसरात गस्त घालत असताना, कर्नाटक राज्यातील आयशर वाहन क्रमांक KA 07 B 4824 मधून गोवंश जनावरांची अवैध वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पंचांना बोलावून चुनाभट्टी गावाजवळ चंद्रपूर-बल्लारपूर महामार्गावर नाकाबंदी केली.
दुपारी सुमारे २.१० वाजताच्या सुमारास संशयित आयशर वाहन चंद्रपूरकडून बल्लारपूरच्या दिशेने येताना दिसले. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा केला असता, चालकाच्या बाजूला बसलेला एक व्यक्ती वाहनाचा दरवाजा उघडून पळून गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला; मात्र तो हाती लागला नाही. त्यानंतर वाहनचालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने आपले नाव सय्यद रियाज सय्यद अमीर जान पाशा ३८ वर्षे रा. कोलार, कर्नाटक असे सांगितले.
पोलिसांनी पंचांसमक्ष वाहनाची तपासणी केली असता, वाहनाच्या मागील भागात ११ गोवंश जनावरे दाटीवाटीने कोंबून आखूड दोराने बांधलेली आढळली. त्यापैकी एक गाय अचेत अवस्थेत पडलेली होती. जनावरांच्या वाहतुकीसाठी आवश्यक परवाना आणि वैद्यकीय प्रमाणपत्राबाबत विचारणा केली असता, चालकाकडे कोणताही वाहतूक परवाना नसल्याचे समोर आले.
चौकशीदरम्यान चालकाने दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील कोलार येथील वाहनमालक आजम पाशा अब्दुल खयम याच्या सांगण्यावरून तो अय्युद एस. बाबु पाशा याच्यासोबत छत्तीसगडमधील रायपूरजवळील चंदखुरी येथे गेला होता. तेथून बैल व्यापारी के. श्रीनिवासप्पा अप्पासाहेब याने खरेदी केलेली ११ गोवंश जनावरे आयशर वाहनातून कर्नाटकात घेऊन जात असल्याचे त्याने सांगितले.
जनावरांना चारा-पाणी आणि औषधोपचाराची व्यवस्था न करता, वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिक जनावरे दाटीवाटीने भरून त्यांची वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. वाहनात जनावरे अत्यंत दाटीवाटीने कोंबलेली असल्याने घटनास्थळी त्यांची वैद्यकीय तपासणी करणे शक्य झाले नाही. त्यामुळे पोलिसांनी पशुवैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने जनावरांना चंद्रपूर येथील छोटा नागपूर परिसरातील प्यार फाउंडेशनच्या गौरक्षण केंद्रात नेले. तेथे जनावरे खाली उतरविल्यानंतर एका तपकिरी रंगाच्या गायीचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले.
या कारवाईत १० लाख रुपये किमतीचे आयशर वाहन, ३ लाख ३० हजार रुपये किमतीची ११ गोवंश जनावरे आणि १० हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण १३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपी वाहनचालक सय्यद रियाज सय्यद अमीर जान पाशा याच्यासह फरार आरोपी अय्युद एस. बाबु पाशा, वाहनमालक आजम पाशा अब्दुल खयम आणि बैल व्यापारी के. श्रीनिवासप्पा अप्पासाहेब यांच्याविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (सुधारित २०१५) तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणातील तीन आरोपी फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, सहायक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांचा नेतृत्वात डी. बी. चे पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड, पोहवा संतोष पंडीत, पुरुषोत्तम चिकाटे, पोअं मिलिंद आत्राम, वैभव गाडगे, महेश कुकुडकर, गुरु शिंदे, संदीप थेरे, फुलचंद लोधी, शांतकुमार घोसे यांनी केले.




Petrol Price




