महत्वाच्या बातम्या

 वीजबिलावरून वाद : मुलाच्या स्क्रूड्रायव्हरच्या वाराने वडिलांचा मृत्यू


- आईच्या तक्रारीवरून २३ वर्षीय मुलाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; उपचारासाठी रुग्णालयांच्या फेऱ्या

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : वीजबिल भरणे आणि घरखर्चासाठी पैसे देण्याच्या मुद्द्यावरून वडील आणि मुलामध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान गंभीर मारहाणीत झाले. या भांडणात मुलाने वडिलांच्या पोटावर स्क्रूड्रायव्हरने वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी विविध रुग्णालयांत नेण्यात आल्यानंतर अखेर मेडिकल रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी मृताच्या पत्नीच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी मुलाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

बबलू सहारे ५६ वर्षे रा. बाबा नानक स्कूल, गरोबा मैदान असे मृत्यू झालेल्या वडिलांचे नाव आहे. तर तुषार बबलू सहारे २३ वर्षे असे गुन्हा दाखल झालेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबलू सहारे हे हमालीचे काम करीत होते, तर तुषार इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतो. वीजबिल भरणे आणि घरखर्चासाठी पैसे देण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून तुषारने वडिलांच्या पोटावर स्क्रूड्रायव्हरने वार केल्याचा आरोप आहे. त्यावेळी बबलू यांनी मद्यप्राशन केले असल्याची माहितीही पोलिस तपासात समोर आली आहे.

दुखापतीनंतरही उपचारासाठी सुरू होती धावपळ -
मारहाणीत पोटाला दुखापत झाल्यानंतर बबलू यांना परिसरातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना घरी आणण्यात आले. मात्र, त्यांचा पोटदुखीचा त्रास कमी झाला नाही. १७ सप्टेंबर रोजी पुन्हा पोटदुखीचा त्रास झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर १८ सप्टेंबरलाही त्रास कायम राहिल्याने पुन्हा खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना मेयो रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार घेतल्यानंतर ते घरी परतले. मात्र, पोटदुखी कायम राहिल्याने १९ सप्टेंबर रोजी त्यांना मानेवाडा परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने तेथून त्यांना मेडिकल रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच बबलू सहारे यांचा मृत्यू झाला.

आईच्या तक्रारीवरून गुन्हा -
या घटनेनंतर बबलू यांच्या पत्नीने लकडगंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तुषार सहारे याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. बबलू यांच्या मृत्यूचे नेमके वैद्यकीय कारण, दुखापतीची तीव्रता आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. वीजबिल आणि घरखर्चाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या कौटुंबिक वादाला गंभीर वळण लागून बबलू सहारे यांचा मृत्यू झाल्याने सहारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.





  Print






Related Photos