महात्मा जोतिबा फुले महाविद्यालयात शिक्षक दिनासह स्वयंशासन दिन उत्साहात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : महात्मा जोतिबा फुले महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बल्लारपूर येथे भारताचे माजी राष्ट्रपती, महान तत्त्वज्ञ व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन तसेच स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचे स्मरण करून शिक्षक दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. शिक्षक हे विद्यार्थ्यांना केवळ ज्ञान देत नाहीत, तर त्यांच्यात संस्कार, मूल्ये, शिस्त आणि योग्य दिशादर्शनाची भावना निर्माण करतात, असे यावेळी नमूद करण्यात आले.
स्वयंशासन दिनाच्या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी एक दिवसासाठी शिक्षक तसेच प्रशासकीय पदांची जबाबदारी स्वीकारून महाविद्यालयीन कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. भुमेश्वरी हिकरे हिने प्राचार्याची भूमिका यशस्वीपणे पार पाडली. तसेच रोशन रॉय, क्रिस्टी पी., नोयल, आयुष जोसेफ, फॅबीओ, रॉयल आदी विद्यार्थ्यांनी सहशिक्षकांच्या भूमिका पार पाडत अध्यापनाची जबाबदारी सांभाळली.
विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिका अत्यंत जबाबदारीने पार पाडत आत्मविश्वास, नेतृत्वगुण, शिस्त, संवादकौशल्य आणि निर्णयक्षमता यांचे दर्शन घडविले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या कार्याची आणि जबाबदारीची प्रत्यक्ष जाणीव झाली. स्वयंशासनातून नेतृत्वगुण विकसित करण्याबरोबरच शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज समजून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली.
या उपक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. दिवाकर मोहितकर, रोशन साखरकर, प्रा. ललित गेडाम आणि डॉ. संदीप सोनोने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रजत मंडल, ग्रंथपाल डॉ. पंकज कावरे, क्रीडा संचालक डॉ. बालमुकुंद कायरकर, डॉ. किशोर चोरे, डॉ. चौहान, डॉ. पल्लवी जूनघरे तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे रोशन साखरकर, ललित गेडाम, डॉ. संदीप सोनोने यांचीही उपस्थिती लाभली.
महाविद्यालयीन कार्यालयीन कर्मचारी प्रकाश मेश्राम, श्यामराव दरेकर व अश्विनी यांचीही उपस्थिती होती. शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. उपस्थितांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विचारांचे स्मरण करून त्यांच्या आदर्श शैक्षणिक मूल्यांचा अंगीकार करण्याचा संकल्प केला. शिक्षक दिन व स्वयंशासन दिनाचा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीपणे पार पडला.




Petrol Price




