महत्वाच्या बातम्या

 मित्रांसोबत खेळायला गेलेल्या ९ वर्षीय बालकाचा तलावात बुडून मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : मित्रांसोबत खेळण्यासाठी गावालगतच्या तलाव परिसरात गेलेल्या ९ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी ५ सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील निलज येथे घडली. जयेंद्र भुमेंद्र चौधरी ९ वर्षे असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेने निलज गावावर शोककळा पसरली असून चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

शनिवारी सुटीचा दिवस असल्याने गावातील काही मुले खेळण्यासाठी गावाजवळील कानाबोडी तलाव परिसरात गेली होती. जयेंद्र चौधरी हाही आपल्या मित्रांसोबत तलाव परिसरात गेला होता. यावेळी त्याचे काही मित्र तलावात मासे पकडत होते. मित्र मासे पकडत असल्याचे पाहून जयेंद्रलाही मासे पकडण्याचा मोह झाला. त्यामुळे तोदेखील तलावातील पाण्यात उतरला.

मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने जयेंद्रचा अचानक पाय घसरला आणि तो खोल पाण्यात बुडाला. ही बाब लक्षात येताच त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरड करून मदतीसाठी हाका मारल्या. त्यानंतर त्यांनी गावात धाव घेत घडलेल्या घटनेची माहिती गावकऱ्यांना दिली.

घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तातडीने तलावाकडे धाव घेतली. जयेंद्रचा शोध घेण्यासाठी गावकऱ्यांनी तलावात शोधमोहीम सुरू केली. बराच प्रयत्न करून शोध घेतल्यानंतर जयेंद्रचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. मात्र त्याला वाचविण्यात यश आले नाही.

जयेंद्रचा मृतदेह हाती लागताच कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. लहान वयातच जयेंद्रचा दुर्दैवी अंत झाल्याने चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने गावातही हळहळ व्यक्त केली जात आहे.





  Print






Related Photos