डोळ्यांत अश्रू, शेतात करपलेली पिके : शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी बांधावर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : काळ्या मातीत घाम गाळून, कर्ज काढून आणि आभाळाकडे डोळे लावून शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी केली. हिरवीगार पिके डोलू लागली की कष्टाचे चीज होईल, कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल आणि हातात चार पैसे उरतील, अशी स्वप्ने त्यांनी पाहिली. मात्र, पावसाने दडी मारल्याने भात आणि कापूस पिकांवर संकट कोसळले आहे. पावसाच्या खंडामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फिरण्याची वेळ आली आहे. शेतातील पिकांची अवस्था आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी आज बल्लारपूर तालुक्यातील आष्टी रिठ आणि पळसगाव येथील शेतांच्या बांधावर पोहोचून नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली.
शेतकऱ्यांसाठी प्रत्येक पीक म्हणजे केवळ उत्पन्नाचे साधन नसते, तर संपूर्ण वर्षाच्या संसाराचा आधार असतो. पेरणीपासून कापणीपर्यंत घेतलेले कष्ट, शेतीसाठी केलेला खर्च आणि कुटुंबाच्या अपेक्षा पिकांशी जोडलेल्या असतात. अशा वेळी पावसाचा खंड पडल्याने पिकांची वाढ खुंटणे आणि उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी पंत यांनी शेतात जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेतली आणि बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधला.
आष्टी रिठ आणि पळसगाव येथील विजय बालाजी भोयर, रामदास भोयर, मुकुंदा मडावी आणि मारुती मडावी यांच्या शेतातील भात व कापूस पिकांची त्यांनी पाहणी केली. पावसाअभावी पिकांवर झालेला परिणाम, संभाव्य उत्पादन घट आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी याबाबत माहिती घेतली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांच्याकडूनही नुकसानीची सविस्तर माहिती जाणून घेतली.
निसर्गाच्या लहरीपणामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अचूक मूल्यांकन होणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. बल्लारपूर तालुक्यातील एकूण पेरणी क्षेत्रापैकी २० टक्के क्षेत्राची प्रत्यक्ष पडताळणी अर्थात ग्राउंड ट्रुथिंग तातडीने पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. महसूल, कृषी आणि जिल्हा परिषद या तिन्ही यंत्रणांनी समन्वयाने काम करून या प्रक्रियेत विलंब करू नये, असेही त्यांनी सांगितले.
नुकसानीचा अहवाल वेळेत प्राप्त झाल्यास त्याआधारे शासनाकडे आवश्यक प्रस्ताव सादर करता येणार आहेत. त्यामुळे ग्राउंड ट्रुथिंगच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी पंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. शेतकऱ्यांचे नुकसान कागदोपत्री नोंदविण्याबरोबरच प्रत्यक्ष शेतातील परिस्थिती लक्षात घेऊन वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्यावर त्यांनी भर दिला.
शेतातील पिके संकटात असताना आता प्रशासनाच्या पाहणीत किती नुकसान नोंदवले जाते आणि शासनाकडून कोणता दिलासा मिळतो, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. वर्षभराच्या कष्टांनंतरही अपेक्षित उत्पादन मिळाले नाही, तर शेतीचा खर्च भागवायचा कसा आणि पुढील हंगामाची तयारी करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहू शकतो. त्यामुळे नुकसानीचे मूल्यांकन आणि शासनस्तरावरील पुढील कार्यवाही वेळेत पूर्ण होणे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
या पाहणी दौऱ्यात बल्लारपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. अर्जुन पावरा, तहसीलदार रेणुका कोकाटे, गटविकास अधिकारी धनंजय साळवे, तालुका कृषी अधिकारी आकाश पवार, ग्राम महसूल अधिकारी, सहायक कृषी अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विलास कुमरे, पळसगावच्या सरपंच संगीता सोयाम, वासुदेव मडावी यांच्यासह परिसरातील शेतकरीही उपस्थित होते.
दरम्यान, जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी ग्रामपंचायत कोर्टीमक्ता येथील केशर आंबा फळबाग लागवड क्षेत्रालाही भेट दिली. विकसित भारत ग्रामीण रोजगार व आजीविका हमी योजना (व्हीबी-जी राम-जी) आणि जिल्हा खनिज निधीच्या अभिसरणातून लागवड करण्यात आलेल्या या फळबाग क्षेत्राची त्यांनी पाहणी केली.




Petrol Price




