देव तारी त्याला कोण मारी! बिबट्याच्या जबड्यातून मृत्यूला हरवून परतला ९ वर्षीय कार्तिक : टाळ्या वाजवून मागितली मदत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : डोळ्यांत महाकाली मातेच्या दर्शनाची आस, सोबत नातेवाईक आणि मनात भक्तीचा भाव... मात्र, वाटेतच काळ बनून आलेल्या बिबट्याने अवघ्या नऊ वर्षांच्या कार्तिकला उचलून नेले! क्षणात आनंदाच्या वातावरणाचे भीतीच्या आक्रोशात रूपांतर झाले. नातेवाईकांच्या डोळ्यांसमोरून चिमुकला कार्तिक दिसेनासा झाला. अंधाऱ्या रात्री जंगलात त्याचा शोध सुरू झाला. प्रत्येक क्षण काळजाचा ठोका चुकवणारा होता. कार्तिक आता सापडेल का, तो जिवंत असेल का, असे असंख्य प्रश्न उपस्थितांच्या मनात घोंगावत होते. मात्र, मृत्यूशी झुंज देणाऱ्या कार्तिकने हार मानली नाही.
तब्बल दोन तासांनंतर शुद्धीवर येताच त्याने टाळ्या वाजवून मदतीसाठी हाक दिली आणि त्याच टाळ्यांच्या आवाजाने त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय देणारी ही हृदयाचा थरकाप उडवणारी घटना बल्लारपूर येथील चुना भट्टी परिसरात घडली.
कार्तिक संजय जाधव हा शांती नगर बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयाच्या मागे परिसरातील रहिवासी आहे. दोन महिन्यांपूर्वीच तो हैदराबाद येथून आपल्या आत्याच्या घरी बल्लारपूर येथे आला होता. रविवारी रात्री सुमारे १०.१५ वाजता तो नातेवाईक आणि शेजाऱ्यांसह ९ ते १० जणांच्या समूहात चंद्रपूर येथील महाकाली मंदिरात दर्शनासाठी पायी निघाला होता. सर्वजण भक्तिभावाने ‘जय माता दी’चा जयघोष करत पुढे जात होते. मात्र, चुना भट्टी येथील प्रवासी निवारा शेडच्या थोडे पुढे जाताच त्यांच्या आनंदावर भीतीचे सावट पसरले.
बॉटनिकल गार्डनच्या भिंतीवर बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घातली आणि कार्तिकला उचलून नेले. काही क्षणांतच चिमुकला नजरेआड झाला. सोबत असलेल्या नातेवाइकांनी आरडाओरड केली; मात्र बिबट्याच्या भीतीने परिसरात एकच गोंधळ उडाला. आपल्या डोळ्यांसमोर कार्तिकला बिबट्याने उचलून नेल्याचे दृश्य पाहून नातेवाईक सुन्न झाले. एका बाजूला चिमुकल्याच्या जीवाची चिंता, तर दुसऱ्या बाजूला अंधारात दबा धरून बसलेल्या बिबट्याची भीती, अशा दुहेरी संकटात सर्वजण सापडले.
घटनेची माहिती पसरताच महाकाली मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांची गर्दी घटनास्थळी जमा झाली. कार्तिकला वाचविण्यासाठी काही धाडसी तरुणांनी हातात टॉर्च घेत अंधाऱ्या परिसरात शोध सुरू केला. पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी-कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घोरुडे आपल्या पथकासह शोधमोहिमेत सहभागी झाले, तर सहायक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत यांनीही घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे आपल्या पथकासहित होते.
बॉटनिकल गार्डनच्या आतील भागात बाबा शेख फरीद यांच्या मागील परिसरात बिबट्या आणि कार्तिकचा शोध घेतला जात होता. प्रत्येक झुडपात, प्रत्येक अंधाऱ्या कोपऱ्यात कार्तिकचा शोध सुरू होता. वेळ पुढे सरकत होती; मात्र त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. कार्तिकच्या नातेवाइकांच्या मनात अनामिक भीती दाटून आली होती. बिबट्याने उचलून नेलेल्या चिमुकल्याचे काय झाले असेल, या विचाराने प्रत्येकाचे काळीज पिळवटून निघत होते.
तब्बल दोन तासांच्या शोधानंतर अचानक रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपातून टाळ्या वाजवण्याचा आवाज ऐकू आला. बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला कार्तिक झुडपात बेशुद्ध पडला होता. काही वेळानंतर शुद्धीवर आल्यावर त्याने मदतीसाठी टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली. काळोखात त्याचा आवाज कुणापर्यंत पोहोचेल की नाही, याची त्याला कल्पना नव्हती; मात्र जगण्याची धडपड त्याला शांत बसू देत नव्हती.
टाळ्यांचा आवाज ऐकून एका व्यक्तीने झुडपाच्या दिशेने धाव घेतली. तेथे जखमी अवस्थेत पडलेला कार्तिक दिसताच त्याने आरडाओरड केली. ‘मिळाला, मिळाला!’ या आवाजाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. काही वेळापूर्वी निराशेच्या छायेत असलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर आशेचा किरण उमटला. कार्तिक जिवंत असल्याचे दिसताच उपस्थितांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मृत्यूच्या छायेतून परतलेल्या या चिमुकल्याला तातडीने बाहेर काढून पोलीस वाहन मधून चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
बिबट्याच्या हल्ल्यात कार्तिकच्या गळ्याच्या दोन्ही बाजूंना बिबट्याचे प्रत्येकी एक दात रुतल्याने गंभीर जखमा झाल्या होत्या. डोक्यालाही खोल जखम झाली होती. त्याची अवस्था पाहून उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकत होता. रात्री सुमारे १.३० वाजता डॉक्टरांनी त्याच्या गळ्यावर आणि डोक्यावर टाके घातले. त्यानंतर तातडीने सीटी स्कॅन करण्यात आले.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घोरुडे यांनी पुढील उपचारांसाठी कार्तिकला रात्री सुमारे २.३० वाजता डॉक्टर मेहरा यांच्या रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला. तेथे त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
महाकाली मातेच्या दर्शनासाठी घराबाहेर पडलेल्या कार्तिकवर वाटेतच बिबट्याने हल्ला केला. काही क्षणांत त्याच्या कुटुंबीयांचे जगच हादरले. दोन तासांचा शोध, अंधारातील धावपळ, नातेवाइकांच्या मनातील भीती आणि अखेर टाळ्यांच्या आवाजाने मिळालेला कार्तिकचा ठावठिकाणा... या प्रत्येक क्षणाने उपस्थितांना सुन्न केले.
बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी होऊनही कार्तिकने शुद्धीवर आल्यानंतर मदतीसाठी टाळ्या वाजवल्या. त्याच्या या प्रयत्नामुळेच त्याला वेळीच शोधता आले. मृत्यूच्या दाढेतून परतलेल्या कार्तिकच्या सुटकेने नातेवाईकांसह उपस्थितांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. संकट कितीही मोठे असले, तरी जगण्याची आशा माणसाला लढण्याचे बळ देते, याची जाणीव करून देणारी ही घटना आहे. खरोखरच, देव तारी त्याला कोण मारी!




Petrol Price




