महत्वाच्या बातम्या

 बँकेतून काढलेले दोन लाख रुपये दुचाकीच्या डिकीतून लंपास : राजुऱ्यात वृद्धाची फसवणूक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : बँकेतून घरगुती कामासाठी काढून आणलेली तब्बल दोन लाख रुपयांची रोकड दुचाकीच्या डिकीत ठेवणे एका ७८ वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीला चांगलेच महागात पडले. अज्ञात चोरट्याने दुचाकीच्या डिकीतून दोन लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना गुरुवारी २७ ऑगस्ट रोजी राजुरा शहरात घडली. प्राप्त माहितीनुसार, अशोक रामचंद्र बोधे ७८ वर्षे रा. मशीद वॉर्ड, शिवशंकर किराणा स्टोअरसमोर, राजुरा हे नगरपरिषद राजुरा येथून सेवानिवृत्त झाले आहेत. घरगुती गरजेसाठी पैशांची आवश्यकता असल्याने ते २७ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे १० वाजता राजुरा येथील CDCC बँकेत गेले होते. तेथून त्यांनी आपल्या खात्यातून दोन लाख रुपये रोख काढले.

बँकेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी ही संपूर्ण रोकड आपल्या ॲक्टिव्हा दुचाकीच्या डिकीत ठेवली. त्यानंतर ते पेट्रोल पंपासमोरील पंचर दुकानात गेले. तेथून नगरपालिका परिसरात काही वेळ थांबल्यानंतर त्यांनी शिव ऑप्टिकल्ससमोर दुचाकी उभी केली व दुकानात गेले. सुमारे दहा मिनिटांनी तेथून घरी परतल्यानंतर त्यांनी ॲक्टिव्हाची डिकी उघडून पाहिली असता त्यात ठेवलेली दोन लाख रुपयांची रोकड गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे अज्ञात चोरट्याने डिकी उघडून अथवा अन्य मार्गाने रोकड लंपास केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

या घटनेनंतर बोधे यांनी राजुरा पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, बँकेतून रोकड काढल्यानंतर वृद्ध व्यक्तीच्या हालचालींवर कोणीतरी पाळत ठेवली होती का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.





  Print






Related Photos