विदर्भात विजांच्या कडकडाटासह कोसळणार पाऊस : ११ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट


विदर्भ न्यूज एक्स्प्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
मागील जवळपास तीन आठवड्यांपासून राज्यातून पाऊस पूर्णपणे गायब आहे. राज्यातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेशात पावसानं उघडीप घेतल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. पण मागील आठवड्यात राज्यात पावसाने पूर्णपणे उघडीप घेतल्यानंतर, विदर्भात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. पुढील दोन दिवस विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांत मेघगर्जनेसह चांगल्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
आज मुंबई, पुण्यासह विदर्भात ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. आज नागपूर, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अकोला अशा एकूण 11 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. वरील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. पण आकाशात विजा चमकण्याचे प्रमाण अधिक असू शकते.
त्यामुळे आकाशात विजा चमकत असताना घराबाहेर न पडण्याचा आणि मोठ्या झाडाखाली आडोशाला उभा न राहण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. उद्याही राज्यात हीच स्थिती राहणार असून वरील अकरा जिल्ह्यांना उद्याही येलो अलर्ट जारी केला आहे. पण राज्यात इतरत्र मात्र चालू आठवड्यात पावसाचे प्रमाण कमीच राहणार असून, पुढील आठवड्यात राज्यात मान्सूनची वापसी होण्याची शक्यता आहे.  Print


News - Nagpur | Posted : 2021-08-09
Related Photos