महत्वाच्या बातम्या

 वन्यजीव हल्ल्यातील १२ बाधितांना १९ लाख २५ हजारांची नुकसानभरपाई : आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते धनादेश वाटप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : वन्यजीवांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना तातडीने आर्थिक दिलासा देण्यासाठी गडचिरोली वनविभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. तहसील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते व वनविभागाच्या उपस्थितीत परिसरातील १२ बाधित नागरिकांना एकूण १९ लाख २५ हजार रुपयांच्या शासकीय नुकसानभरपाईचे धनादेश सुपूर्द करण्यात आले.

मुख्य वनसंरक्षक जी. पी. नरवणे, उपवनसंरक्षक शैलेश मीना, सहाय्यक वनसंरक्षक आकर्ष बासापुरा व दीपक रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला. वन्यजीव हल्ल्यात गंभीर व किरकोळ जखमी झालेल्या नागरिकांचे पंचनामे तातडीने पूर्ण करून शासनमान्य मदत थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली.

यावेळी बोलताना आमदार डॉ. आत्राम म्हणाले की, मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी शासन व वनविभाग कटिबद्ध असून बाधित कुटुंबांच्या पाठीशी प्रशासन खंबीरपणे उभे आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

वनपरिक्षेत्र अधिकारी अमर हणमंत भिसे व योगेश शेरेकर यांनी नागरिकांना जंगलालगतच्या भागात शेतीकाम करताना खबरदारी घेण्याचे, रात्रीच्या वेळी एकटे न फिरण्याचे आणि वन्यप्राणी आढळल्यास तातडीने वनविभागाला कळवण्याचे आवाहन केले.

तहसील कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी शुभम पाटील, तहसीलदार किशोर बागडे, वनपरिक्षेत्र अधिकारी अमर भिसे व योगेश शेरेकर, मुख्य अधिकारी अभिजीत सोनवणे, वनपाल महेश खोब्रागडे, वनरक्षक माधुरी तलांडे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, गावचे सरपंच-उपसरपंच, बाधित शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






Related Photos