महत्वाच्या बातम्या

 सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात लेझर लाईट व डी.जे.वर निर्बंध


- पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांचे आदेश; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / चंद्रपूर : आगामी पोळा, तान्हा पोळा, गणेशोत्सव आणि विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. सार्वजनिक शांतता, नागरिकांचे आरोग्य आणि सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या लेझर लाईट, तीव्र फ्लॅश लाईट, डी.जे. तसेच मॉडिफाइड साउंड सिस्टीमवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३६ व ३८(१) अन्वये विशेष निर्बंध व मनाई आदेश जारी केले आहेत.

५ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजल्यापासून २७ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपक, लाऊडस्पीकर किंवा अ‍ॅम्प्लीफायर वापरण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्व लेखी परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

मिरवणुकीदरम्यान मानवी डोळ्यांना तसेच आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या लेझर लाईट, अत्यंत तीव्र फ्लॅश लाईट आणि इतर प्रकाशयंत्रणांच्या वापरावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. पोलिस अधिकारी किंवा सक्षम प्राधिकारी मिरवणुकीतील प्रकाशयंत्रणांची तपासणी करू शकतील. धोकादायक प्रकाशयंत्रणा आढळल्यास ती तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले जाणार आहेत.
डी.जे. प्लाझ्मा सिस्टीम, मॉडिफाइड साउंड इक्विपमेंट, बुफर, सबवुफर आणि अत्यंत तीव्र ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर पूर्णतः बंदी राहणार आहे. परवानगीशिवाय कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपक किंवा लाऊडस्पीकर लावल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. रात्री १० ते सकाळी ६ या कालावधीत ध्वनिक्षेपक व डी.जे. वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून विशेष सूट देण्यात आलेले दिवस किंवा वेळ याला अपवाद राहतील.

औद्योगिक क्षेत्रात दिवसा ७५ व रात्री ७० डेसिबल, व्यावसायिक क्षेत्रात दिवसा ६५ व रात्री ५५ डेसिबल, निवासी क्षेत्रात दिवसा ५५ व रात्री ४५ डेसिबल, तर शांतता क्षेत्रात दिवसा ५० व रात्री ४० डेसिबलची ध्वनी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. रुग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालये आदी घोषित शांतता क्षेत्रांमध्ये ध्वनी मर्यादांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहणार आहे.

निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून ध्वनी व प्रकाशयंत्रणा जप्त करण्याची कारवाई केली जाणार आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या संबंधित कलमांनुसार आयोजक, डी.जे. ऑपरेटर किंवा वाहनचालकांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. आवश्यकतेनुसार वारंटशिवाय अटक तसेच न्यायालयात खटला दाखल करण्याची कारवाईही केली जाऊ शकते.

उत्सवाच्या नावाखाली ध्वनी व प्रकाश प्रदूषण करून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश पोलिस प्रशासनाने दिला आहे. सर्व उत्सव मंडळे, आयोजक आणि नागरिकांनी निर्बंधांचे काटेकोर पालन करून शांततापूर्ण वातावरणात सण-उत्सव साजरे करावेत आणि पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.





  Print






Related Photos