महत्वाच्या बातम्या

 चैनीच्या वस्तूंच्या हव्यासापोटी चोरीचा मार्ग पत्करला : तीन महाविद्यालयीन तरुण जेरबंद, १.४१ लाखांच्या ६३ बॅटऱ्या जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : शिक्षण घेऊन भविष्य घडविण्याच्या वयात महागड्या चैनीच्या वस्तूंचा मोह तीन महाविद्यालयीन तरुणांना चोरीच्या मार्गावर घेऊन गेला. हौसमौज आणि महागड्या वस्तूंची आवड पूर्ण करण्यासाठी त्यांनी थेट दुचाकी सर्व्हिस सेंटरच्या गोडाऊनलाच लक्ष्य केले. मात्र, दोन सर्व्हिस सेंटरमधील बॅटऱ्या चोरणाऱ्या या तिघांच्या कृत्याचा रामनगर पोलिसांनी पर्दाफाश केला. तेजल रत्नाकर गेडाम २१ वर्ष, रा. इंदिरानगर, वाल्मीक चौक, चंद्रपूर, आदित्य मारुती रामटेके २० वर्ष, रा. मसाळा, तुकूम, ता. जि. चंद्रपूर आणि सुजल अविनाश रत्नपारखी २२ वर्ष, रा. बाबूपेठ, फुले वॉर्ड, चंद्रपूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून १ लाख ४१ हजार रुपये किमतीच्या ६३ बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

पवनसुत होंडा सर्व्हिस सेंटरच्या गोडाऊनमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या ४७ दुचाकींच्या बॅटऱ्या २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ ते २२ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या होत्या. याप्रकरणी सर्व्हिस सेंटरचे व्यवस्थापक सौरव अशोक पांडे यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याशिवाय शिवशंकर होंडा शोरूममधूनही ७९ बॅटऱ्या चोरीला गेल्याने व्यावसायिकांमध्ये चिंता निर्माण झाली होती.

दोन्ही ठिकाणच्या चोरीची पद्धत एकसारखी असल्याने एकाच टोळीने या चोऱ्या केल्याचा संशय पोलिसांना आला. रामनगर पोलिसांच्या शोध पथकाने तपास सुरू केला. दरम्यान, बंगाली कॅम्प परिसरात काही तरुण चोरीच्या बॅटऱ्या विक्री करण्याच्या प्रयत्नात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपींनी दोन्ही चोरीच्या घटनांची कबुली दिली. महागड्या चैनीच्या वस्तू खरेदी करण्याचा मोह आवरता न आल्याने चोरी केल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणाच्या वयात चुकीच्या मार्गाने हौसमौज पूर्ण करण्याच्या नादात त्यांनी गुन्हेगारीचा रस्ता धरल्याचे या घटनेतून समोर आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ६३ बॅटऱ्या जप्त करून दोन्ही गुन्ह्यांचा छडा लावला आहे. आणखी चोरीचा मुद्देमाल मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, हनुमान उगले, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे तसेच पोलीस अंमलदार आनंद खरात, प्रकाश बलकी, मंगेश शेंडे, रामप्रसाद नैताम, बाबा नैताम, रविकुमार ढंगळे, जितेंद्र आकरे, मनिषा मोरे, पंकज ठोंबरे, प्रकाश मडावी, संदीप गेडाम, पंकज पोंदे, सूरज शेडमाके आणि ब्ल्युटी साखरे यांनी केले.





  Print






Related Photos